Parbhani Municipal Corporation : शिंदे गटाच्या खेळीने परभणी महानगरपालिकेतील समीकरण बदलणार; काँग्रेसला बसणार फटका
Parbhani Municipal Corporation : शिंदे गटाची महानगरपालिकेत राजकीय ताकद वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 11 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे परभणी जिल्ह्याचा दौरा करत आहेत.
Parbhani Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी देखील कामाला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच परभणी (Parbhani) जिल्ह्यात शिंदे गटाच्या खेळीने महानगरपालिकेतील समीकरण बदलणार आहे. कारण काँग्रेसला धक्का देत अनेक आजी-माजी नगरसेवकांनी थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
परभणी महानगरपालिकेतील 50 पेक्षा जास्त आजी-माजी नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश झालाय. त्यामुळे आगामी काळातील परभणी महानगरपालिकेची समीकरणे बदलणार आहेत. सोबतच शिंदे गटाची महानगरपालिकेत राजकीय ताकद वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 11 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे परभणी जिल्ह्याचा दौरा करत असून, त्यापूर्वी झालेला हा प्रवेश सोहळा महत्वाचा समाजाला जात आहे. त्यामुळे 11 जानेवारीला होणाऱ्या शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची देखील शक्यता आहे.
परभणीत शिंदे गटाची ताकद वाढणार...
शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहर महानगरपालिकेत मागच्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेले काँग्रेसचे नेते माजू लाला, हाफिज चाऊस या दोन दिग्गज नगरसेवकांसह इतर 30 ते 35 आजी-माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच, जिंतूर नगरपालिकेतील 15 आजी-माजी नगरसेवकांचा सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेनेत प्रवेश झालाय. माजू लाला यांचा आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश झाल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकंदरीत शिवसेनेची परभणीत ताकत वाढलीय. यामुळे येत्या काळात महानगरपालिकेची समीकरण बदलणार असुन, काँग्रेसला महापालिकेत मोठी कसरत करावी लागणार आहे.
शिंदे गटात गटबाजी...
एकीकडे परभणी जिल्ह्यात शिंदे गटाची राजकीय ताकद वाढत आहे, तर दुसरीकडे पक्षात गटबाजी देखील पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्री शिंदेंच्या परभणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीकडे काही महत्वाच्या नेत्यांनी पाठ फिरवली. शिवसेनेचे सचिव संजय मोरे, लोकसभा संपर्कप्रमुख अर्जुन खोतकर, शिवसेना उपनेते आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत शहरातील कृष्णा गार्डन या ठिकाणी आज शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे आणि माधव कदम यांचा एक गट उपस्थित होता. मात्र, शिवसेनेचे अल्पसंख्याक नेते सईद खान आणि महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांचा गट अनुपस्थित होता. त्यामुळे शिंदे गटात असलेली गटबाजी या बैठकीत पाहायला मिळाली. तर, अनुपस्थित असलेले दोन्ही नेते पक्षातील काही इतर नेत्यांच्या भुमिकेमुळे नाराज असल्याची देखील बोलले जात आहेत. तर, बैठकीचे आम्हाला आमंत्रण नसल्याने आम्ही जाणं टाळले असल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी परभणीत शिंदे गटात गटबाजी; नाराज नेते थेट मुंबईकडे निघाले