मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी परभणीत शिंदे गटात गटबाजी; नाराज नेते थेट मुंबईकडे निघाले
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या आढावा बैठकीत शिवसेनेतील एक मोठा गट अनुपस्थित राहिल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
परभणी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह संपूर्ण शिवसेना (शिंदे गट) कामाला लागली आहे. तर, स्वतः मुख्यमंत्री शिंदे राज्याचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे 11 जानेवारीला शिंदे परभणी (Parbhani) जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मात्र, त्यांच्या याच दौऱ्यापूर्वी परभणीतील शिवसेनेत (शिंदे गट) प्रमुख नेत्यांमध्ये गटबाजी पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या आढावा बैठकीत शिवसेनेतील एक मोठा गट अनुपस्थित राहिल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे नाराज गट थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला मुंबईकडे निघाले असल्याची देखील समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 जानेवारीला परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्या अनुषंगाने आज पक्षाची आढावा बैठक बोलवण्यात आली होती. शिवसेनेचे सचिव संजय मोरे, लोकसभा संपर्कप्रमुख अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या आढावा बैठकीला शिवसेनेतील एक मोठा गट अनुपस्थित असल्याचे पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला दांडी मारणाऱ्या नेत्यांनी थेट मुंबईकडे कूच करत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
'या' दोन महत्वाच्या नेत्यांची अनुपस्थिती..
शिवसेनेचे सचिव संजय मोरे, लोकसभा संपर्कप्रमुख अर्जुन खोतकर, शिवसेना उपनेते आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत शहरातील कृष्णा गार्डन या ठिकाणी आज शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे आणि माधव कदम यांचा एक गट उपस्थित होता. मात्र, शिवसेनेचे अल्पसंख्याक नेते सईद खान आणि महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांचा गट अनुपस्थित होता. त्यामुळे शिंदे गटात असलेली गटबाजी या बैठकीत पाहायला मिळाली. तर, अनुपस्थित असलेले दोन्ही नेते पक्षातील काही इतर नेत्यांच्या भुमिकेमुळे नाराज असल्याची देखील बोलले जात आहेत.
बैठकीचे निमंत्रण नसल्याने नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली...
विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे परभणी शहरात शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरु होती, तर दुसरीकडे बैठकीत अनुपस्थित असलेले सईद खान हे मुंबईकडे रवाना झाले. परभणी जिल्ह्यातील काही काँग्रेस-राष्ट्रवादीचे आजी माजी नगरसेवक यांना घेऊन त्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करण्यासाठी ते मुंबईला गेले असल्याचे बोलले जात आहे. तर, आम्हाला या बैठकीचे निमंत्रण नव्हते. त्यामुळे आमचा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता या बैठकीकडे गेला नाही," अशी प्रतिक्रिया सईद खान आणि महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांनी फोनवरून दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: