भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण
विधानसभेच्या विशेष अधिवेशनापूर्वी हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात आली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी पदभार स्वीकारला.
मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. नवनिर्वाचित सर्वच आमदारांची (MLA) शपथविधी आणि राज्यपालांचे अभिभाषण होऊन विधानसभेच्या कामकालाजाही लवकरच सुरुवात होईल. त्यासाठी, 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते. त्यानुसार, आज पहिल्याच दिवशी सर्वच पक्षांचे आमदार सभागृहात पोहोचले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदारकीची शपथ घेतली. मात्र, भाजपच्या एका आमदाराने चक्क भगवद्गगीता सोबत घेऊन आमदारकीचे शपथ घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे, आमदार सुरेश खाडे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, येथे अगोदरच ते भगवद्गीतेचं पुस्तक ठेवण्यात आलं होतं, सर्वच आमदारांच्या शपथविधीवेळी ते पुस्तक त्याच ठिकाणी होती. पण, कुणीतरी सुरेश खाडे यांचा फोटो व्हायरल केल्याची माहिती आहे.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनापूर्वी हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात आली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज सर्वच आमदारांचा शपथविधी संपन्न होत आहे. आत्तापर्यंत 160 पेक्षा जास्त आमदारांचा शपथविधी पूर्ण झाल्याची माहिती आहे. तर, महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथविधी न करण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत विशेष अधिवेशनातच महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, भाजप आमदार सुरेश खाडे यांनी आमदारकीची शपथ घेताना चक्क भगवद्गगीता आपल्यासोबत ठेवली होती. भगवद्गगीतेला साक्षी मानून त्यांनी आमदारीकीची शपथ घेतली. त्यांचा शपथ घेतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर, काँग्रेस खासदारानेही या शपधविधीवर आक्षेप घेत संताप व्यक्त केलाय.
विधानसभेच्या सभागृहात शपथविधीवेळी भगवद्गीता ठेवण्यात आली. मुळात हे सभागृह आहे, त्यामुळे येथे धर्म बाजूला ठेऊन सभागृहात यायला हवं. कारण , इथ संविधान महत्वाचं आहे. या संविधानाच्या जोरावर मी इथ 20 वर्ष सदस्य म्हणून काम करत होते, असे म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी आमदार महोदयांच्या शपथविधीला आक्षेप घेतला. त्यामुळे, आमदारांच्या शपथविधीचा हा फोटो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, सर्वच आमदारांच्या शपथविधीवेळी ते पुस्तक त्याच ठिकाणी होती. पण, कुणीतरी सुरेश खाडे यांचा फोटो व्हायरल केल्याची माहिती आहे.
सुरेश खाडे मिरज मतदारसंघातून आमदार
सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मिरज मतदारसंघात भाजपच्या सुरेश खाडे यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या तानाजी सातपुते यांचा 44 हजारांहून अधिक मताधिक्यांने विजय मिळवला. भाजपच्या सुरेश खाडे यांना 1,28, 753 मतं मिळाली. तर शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांना 84,047 मतं मिळाली. सुरेश खाडे यांनी 44,706 मतांनी विजय मिळवला आहे.
हेही वाचा
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अजिली दमानियांनी सगळंच काढलं