Parbhani News: परभणीत पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह कमेंट; ओबीसी समाजाच्या वतीनं जिंतूर बंदची हाक
Offensive Comment on Pankaja Munde: बीडपाठोपाठ आता परभणीत पंकजा मुंडेंबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. ओबीसी समाजाच्या वतीनं जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे.
Parbhani News: परभणी : परभणीच्या (Parbhani News) जिंतूर (Jintur News) तालुक्यातील एका तरुणानं भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे वाद निर्माण झाला. याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाच्या वतीनं जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून जिंतूर शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. कमेंट करणारा तरुण हा अल्पवयीन असून त्याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. सध्या जिंतूरमध्ये शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या आक्षेपार्ह्य पोस्टनंतर बीडमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. बीड जिल्ह्यातील अनेक गावांनी याच्या निषेधार्थ बंदची हाक दिली होती. बीड, पाथर्डी, वडवणी, शिरुर यांसारख्या अनेक गावांनी बंदची हाक दिली होती. आता अशातच पुन्हा एकदा परभणीमध्ये एका तरुणानं सोशल मीडियावर एका पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केली आहे. पंकजा मुंडेंबाबत ही आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली आहे. याचेच पडसाद परभणीच्या जिंतूरमध्ये उमटले आहेत. ओबीसी समाजाच्या वतीनं आज जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे.
आक्षेपार्ह पोस्ट, तणावाचं वातावरण, नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांत बीडचा निकाल अत्यंत धक्कादायक होता. बीडमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी दणदणीत विजय मिळवला. पण, परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळालं.
बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय पक्का असल्याचं बोललं जात होतं. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचा निकाल जाहीर झाला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीनं फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह पोस्ट लिहिली.