Truck Drivers Strike : परभणी शहरातील 15 पैकी 10 पेट्रोल पंपावर 'नो स्टॉक'; शहरात इंधन टंचाईची शक्यता
Truck Drivers Strike : इंधन मिळत नसल्याने आता नेमकं करायचं काय असा प्रश्न सामान्य परभणीकरांना पडलाय. तसेच, संपावर लवकर तोडगा न निघाल्यास परभणी जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
Truck Drivers Strike : केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याला विरोध करत राज्यभरात ट्रक चालक (Truck Drivers) आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे देशभरातील जड वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम आता सर्वत्र दिसू लागलेला आहे. परभणी (Parbhani) शहरातील जवळपास 15 पैकी 10 पेट्रोल पंपांवरील इंधन संपलं आहे. तर 5 पेट्रोल पंपांवरील (Petrol Pump) इंधनही संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परभणीकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतोय. अनेक पंपांवर 'नो स्टॉकचे बोर्ड' लागलेले आहेत. इंधन मिळत नसल्याने आता नेमकं करायचं काय असा प्रश्न सामान्य परभणीकरांना पडलाय. तसेच, संपावर लवकर तोडगा न निघाल्यास परभणी जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्टेअरिंग छोडो आंदोलन
केंद्र सरकारने हीट अँड रन केसमधील वाढवलेल्या शिक्षा आणि दंडाच्या तरतुदी विरोधात परभणीत वाहक चालक-मालक संघटनेच्या वतीने स्टेअरिंग छोडो आंदोलन करण्यात आले आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर विविध वाहन चालक मालक एकत्र आले असून, सर्वांनी या संपामध्ये सहभाग नोंदवत जोरदार घोषणाबाजी केलीय. जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यामार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन
केंद्र सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नवीन वाहन कायद्यात चालकांसाठी अनेक धोकादायक निर्णय घेण्यात आले आहेत. अगोदरच चालक धोका पत्करून वाहन चालवितात, यात जाणिवपूर्वक कोणी अपघात करीत नाही. अपघातानंतर जखमींना रूग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी चालकास देण्यात आली असली तरी त्या अगोदरच परिसरातील नागरिक संतप्त होऊन चालकास मारहाण करतात. अशावेळी चालकास आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणाहून पळून जावे लागते. ही स्थिती लक्षात घेवून नवीन कायद्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करत ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आल आहे.
नवीन वाहन कायदा रद्द करा: वडेट्टीवार
केंद्र सरकारचा नवीन वाहन कायदा जुलमी असून, सरकारने हा काळा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारने जुलमी कायदे करून 700 शेतकऱ्यांचे जीव घेतले आणि आता पुन्हा एकदा वाहन चालकांसाठी जुलमी कायदा केला आहे. वाहन चालकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा कायदा तयार करण्यात आला आहे. सरकार अशे जुलमी कायदे करून लोकांना वेठीस धरत असल्याने लोकं त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. तर या आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
कुठे पोलीस बंदोबस्त, कुठे हाणामारी, तर कुठे पेट्रोल पंपचं बंद; अशी आहे मराठवाड्यातील परिस्थिती