(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना मराठा आरक्षण सर्व्हेचं काम, शिक्षण व्यवस्था सलाईनवर!
राज्य शासनाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या या मराठा सर्वेक्षण प्रक्रियेमध्ये 36 जिल्हे, 27 महापालिका आणि 7 कॅन्टॉन्मेंट बोर्डचा समावेश आहे.
परभणी : राज्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्व्हेत ऐन परीक्षांच्या काळात शिक्षकांना अडकवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सर्व्हेचे काम हे 80 टक्के शिक्षकांना देण्यात आल्याने ऐन परीक्षांच्या हंगामात अख्खी शिक्षण व्यवस्थाच सलाईनवर आली आहे. घरोघरी जाऊन मराठा आणि खुल्या प्रवर्गाची (Maratha Rservation) माहिती मोबाईलच्या माध्यमातून माहिती ऑनलाईन भरतात. अचानक सरकारचा आदेश धडकला अन् राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधील 80 टक्के शिक्षकांना सर्व्हे करण्याच्या कामाला लावण्यात आले. जर हे काम नाही केले तर याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवून कारवाई केली जाईल अशी तंबी ही देण्यात आली. मग काय सर्व शिक्षक शाळेतील काम, ज्ञानार्जन सोडून सर्व्हेच्या कामाला लागले. ज्यामुळे तिकडे शाळांमधील सर्व नियोजनच बिघडून गेले.
राज्य शासनाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या या मराठा सर्वेक्षण प्रक्रियेमध्ये 36 जिल्हे, 27 महापालिका आणि 7 कॅन्टॉन्मेंट बोर्डचा समावेश आहे. सर्वेक्षणासाठी राज्यातून साधारण 1 लाख २५ हजारांपेक्षा अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल यंत्रणेनेही सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुट्ट्या अन सर्व्हेमुळे शाळेचा बट्ट्याबोळ
- 18 जानेवारी 2024 शिक्षकांना प्रशिक्षणासाठी म्हणून सुट्टी
- 20 जानेवारी रोजी नवोदय परीक्षा सुट्टी
- 21 ,22 जानेवरी रोजी श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापणेची सुट्टी
- 23,24,25 जानेवारीपर्यंत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्यामुळे सुट्टी
- 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत सर्व्हे सुट्टी
सध्या कोणत्या परीक्षा सुरु?
दहावी बारवीच्या सराव परीक्षा सुरु आहेत. पुढच्या आठवड्यात प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होणार. शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षा
पाचवी ते नववीच्या द्वितीय सत्राची परीक्षा एप्रिल महिन्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाचवी ते नववीच्या घटक चाचण्या सुरू आहेत.
मुलांच्या गुणवत्तेची जवाबदारी कोण घेणार?
शिक्षक शाळेत नसल्याने राज्यात काही शाळांनी वर्ग सोडून दिले आहेत. काहींनी अर्धी सुट्टी दिलीय,काही ठिकाणी ज्या महिला शिक्षिका आहेत त्या महत्वाच्या वर्गांची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळांना सुट्टीच असल्यासारखे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही शाळांची फी भरायची इतर शैक्षणिक खर्च करायचा अन् शाळेतील शिक्षकांना इतर कामे लावण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सहन करायचे मग आमच्या मुलांच्या गुणवत्तेची जवाबदारी कोण घेणार असा सवाल पालक विचारत आहेत.
नुकताच असर या महत्वाच्या संस्थेचा अहवाल आलाय ज्यात राज्यातील 25 टक्के शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली असल्याच त्यात म्हंटल आहे. मुलभूत वाचन अन् लेखनही नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. असे असताना शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्याऐवजी शिक्षकांना बीएलओ,सर्व्हे,आदी कामं लावण्यात येत असल्याने राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेकडे खरचं कोण लक्ष देणार हाच प्रश्न आहे.
हे ही वाचा :
Manoj Jarange Patil : पुण्यातील मराठा वादळ पाहून सरकारी 'पळापळ' सुरु; पोलिस चर्चेला पोहोचले, शिष्टमंडळ सुद्धा आजच पोहोचणार