Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी, संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरुन हत्या झाल्याचा आरोप
बीड: केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख या तरुण सरपंचाचा विचित्रपणे बेदम मारहाण करून खून करण्यात आला. त्यामुळे सध्या बीड जिल्हा (Beed News) चर्चेत आहे. परंतु याच बीड जिल्ह्यामध्ये 1222 हे बंदुकीचे परवानाधारक आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात पाच ते सहा पट बंदुकीचे परवानाधारक (Gun License) आहेत. त्यामुळे तत्काळ परवानाधारकांची पूर्णतपासणी करण्यात यावी आणि सध्या तातडीने सर्व बंदुकीची लायसन रद्द करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या अध्यक्षांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. याप्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील पोलीस दल वेगाने कामाला लागले आहे. गुरुवारी सीआयडीचे महासंचालक केजमध्ये आले होते. त्यांनी बीड जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांशी तब्बल चार-साडेचार तास चर्चा केली. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. याशिवाय, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीदेखील संतोष देशमुख हत्याप्रकरणात विशेष लक्ष घातले आहे. या संपूर्ण प्रकरणात हत्या, अॅट्रोसिटी आणि खंडणी असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून या सगळ्याचा तपास सीआयडी करणार आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कारवाईला वेग यावा आणि हत्येच्या सूत्रधारांना पकडण्याची मागणी होत आहे. यासाठी शनिवारी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चावेळी सुरेश धस, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित हे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात राजकारण नाही, सर्वपक्षीय आमदारांच एकमत: संदीप क्षीरसागर
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात बीड जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने मांडला. यामध्ये कोणतंही राजकारण आणलं नाही. मी याबाबत भाजपच्या लोकांना बोललो, अजितदादा आणि शिंदे साहेबांच्या आमदारांनीही हा मुद्दा सभागृहात मांडला. राजकारणात वैर आणि भांडणं होतात. पण संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली, ती बाब निषेधार्ह आहे. संतोष देशमुख खंडणी मागत होते, अशी चर्चा आहे. पण संतोष देशमुख यांचं घर पत्र्याचं होतं, पाऊस सुरु झाला की त्यांचं घर गळायला लागतं. गावातील बौद्ध समाजाच्या माणसाला त्रास दिला त्यामुळे संतोष देशमुख जाब विचारायला गेले होते. ते तीन टर्म सरपंच राहिले होते, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.
आणखी वाचा