मराठा आंदोलकांनी परभणीत विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ रोखला; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
Viksit Bharat Sankalp Yatra : गावकऱ्यांचा होणारा विरोध पाहता विकसित भारत संकल्प यात्रेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेत गावातून माघार घेतली.
Parbhani : परभणीत विकसित भारत संकल्प यात्रेला (Viksit Bharat Sankalp Yatra) होणार विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्णेतील लिमला गावातील मराठा बांधवांनी विकसित भारत यात्रेच्या रथाला विरोध केला आहे. सोबतच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत ना योजना, ना प्रचार करू देणार असल्याची भूमिका यावेळी मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांचा होणारा विरोध पाहता विकसित भारत संकल्प यात्रेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेत गावातून माघार घेतली.
परभणी जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध कायम असून, परभणीच्या पुर्णा तालुक्यातील लिमला येथील गावकऱ्यांनी आज या यात्रेचा रथ शाळेसमोर रोखला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात ना सरकारच्या योजनांचा प्रचार करू देणार, ना निवडणूक होऊ देणार असा निर्धार या गावकऱ्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ परतावून लावलाय. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
गावात तब्बल 100 दिवसांपासून साखळी उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुर्णा तालुक्यातील लिमला गावात तब्बल 100 दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे उपोषण असेच सुरु असणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. गावातील सर्वच धर्मातील लोकं या उपोषणाला पाठींबा देत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. असे असतांना आज याच गावात केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली होती. मात्र, आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत गावात कोणतेही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
गावकऱ्यांसह शाळकरी मुलेही आंदोलनात सहभागी...
लिमला गावात आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहचताच सकल मराठा समाजाच्या वतीने त्याला विरोध झाला. यावेळी गावातील महिला-पुरुष सर्वच एकत्र आले आणि त्यांनी याला विरोध केला. विशेष म्हणजे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या समोरच हा कार्यक्रम होणार होता. त्यामुळे शाळेतील मुलं देखील आपल्या पालकांच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली. गावकऱ्यांचा होणारा हा संपर्ण विरोध पाहता संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी देखील आपला कार्यक्रम रद्द करत गावातून काढता पाय घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या: