(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani: लम्पी प्रतिबंधक लसीकरण झालेल्या गुरांचा बाजार भरवण्यास परभणी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
Lumpy Skin Disease: लम्पी प्रतिबंधक लसीकरण झालेल्या गुरांचा बाजार भरवण्यास परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
Lumpy Skin Disease: राजस्थानसह देशभरातील अनेक राज्यात थैमान घालणाऱ्या लम्पीचा (Lumpy) प्रादुर्भाव महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात देखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आपापल्या जिल्ह्यातील लम्पीची परिस्थिती पाहता जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश काढले होते. मात्र आता पुन्हा परिस्थिती नियंत्रणात असल्याने जनावरांचे आठवडी बाजार पुन्हा एकदा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान याचवेळी लम्पी प्रतिबंधक लसीकरण झालेल्या गुरांचा बाजार भरवण्यास परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी प्रसिूद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
जिल्ह्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळून येत आहेत. जिल्ह्यात त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी जनावरांची वाहतूक, खरेदी विक्री करण्यास आणि शर्यती लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी अटी शर्तीच्या अधीन राहून जनावरांचा बाजार भरवण्यास परवानगी देत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी प्रसिूद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यातील गोवंशीय पशुधनास सशर्त जिल्ह्यांतर्गंत गुरांच्या वाहतुकीस मान्यता देण्यात आली असून, लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात प्राणी बाजार भरवणे आणि प्राण्यांच्या शर्यतीस परवानगी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
'या' नियमांचे पालन करावे लागणार!
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुरांचे 28 दिवसांपूर्वी लम्पी प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे. गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग व नंबर असणे आणि त्याची ईनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. वाहतुकीची गुरे संक्रमित नसल्याचे आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी शासन किंवा जिल्हा परिषदेतील पशुधन विकास अधिकारी यापेक्षा कमी दर्जाचा नसलेला सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. वाहतूक काळात गुराचे आरोग्य प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक असून, जिल्ह्यातील पशू बाजारामध्ये यापुढे टॅगींग व रोग प्रतिबंधक लसीकरण खात्री झाल्याशिवाय व्यवहार, शर्यतींचे आयोजन करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध
परभणी जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतक-यांनी लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईसाठी संकेतस्थळ आणि गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल अँपवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी केले आहे. पशुपालकांसाठी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूमहापशुआरोग्यडॉटकॉम (www.mhpashuaarogya.com) या संकेतस्थळावर आणि Google play स्टोअरवर पशुसहायता (PASHU SAHAYATA) हे मोबाईल अँप तयार करण्यांत आले आहे. लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशुपालकांनी या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज करताना पशुपालकांनी स्वतःच्या मोबाईलचा वापर करावा. नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नेमाडे यांनी केले आहे.
संबंधित बातम्या: