(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Virus : कडाक्याच्या थंडीने लम्पीग्रस्त जनावरांवर विषाणूजन्य आजारांचा विळखा, दूध उत्पादन घटण्याची भीती
वातावरणातील या बदलामुळे प्राणी आता अन्न खाणे बंद करून मृत्यूकडे ओढल्या जात आहेत. यामुळे मात्र राज्यभरातील दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात गेला आठवडाभर ढगाळ वातावरण व अवकाळी पावसानंतर आता तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गुरांवर वेगवेगळ्या विषाणूजन्य आजारांचा विळखा बसताना दिसत आहे. आधीच लम्पीमुळे (Lumpy Virus) ग्रासलेल्या जनावरांना आता कडाक्याच्या थंडीमुळे वेगवेगळ्या आजारांची लागण होताना दिसत आहे. यामुळे मात्र पशुपालक चिंतेत आहे.
राज्यभरात सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे आता जनावारांध्ये " फूट अॅन्ड माऊथ डिसीज " अर्थात तोंडखुरी व पायखुरी असे विषाणूजन्य आजार बळावत आहे. लम्पी नियंत्रणात येतो न येतो तोच आता पशुपालक गुरांवरील या नवीन संकटाने धास्तवले आहेत. वातावरणातील या बदलामुळे प्राणी आता अन्न खाणे बंद करून मृत्यूकडे ओढल्या जात आहेत. यामुळे मात्र राज्यभरातील दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. दूध उत्पादक संकटात आहे.
आगामी काळात जर थंडीच प्रमाण वाढलं तर आता कुठे नियंत्रणात आलेला लम्पी आजाराचा फैलाव मात्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती ही पशुवैद्यक तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे अशा आजारांपासून आपल्या प्राण्याला वाचविण्यासाठी बाधित जनावारांचं विलगीकरण करून लसीकरण करून घेण्याचं आवाहन बुलढाण्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजेंद्र पाटील यांनी केलं आहे.
साधारणतः जानेवारी आणि फेब्रुवारी हे थंडीचे महिने असतात आणि या दोन महिन्यात राज्यातील जनावरांवर दरवर्षी थोड्याफार प्रमाणात विषाणूजन्य आजाराची साथ असते. पण यावर्षी लम्पीमुळे आधीच बाधित गुरांवर जर तोंडखुरी व पायखुरी अशा आजाराचे हल्ला केला तर मात्र गुरे चारा पाणी खाणे बंद करतात आणि याच सरळ परिणाम हा दूध उत्पादनावर होतो . त्यामुळे जर अजून थंडीच प्रमाण राज्यात वाढलं तर मात्र आगामी दिवसात दूध उत्पादन घटण्याची भीती ही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
राज्यातील दूध उत्पादन या महिन्यात किती असते?
- जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी दूध उत्पादनात घट होत असते.
- कडाक्याच्या थंडीमुळे गुरे चारा खाणे कमी करतात त्यामुळे दूध उत्पादन कमी होते
- साधारणतः पावसाळ्यानंतर गुरांवर विषाणूजन्य आजार येतात त्यामुळे दूध उत्पादन घटते
- थंडीमुळे साधारणपणे राज्यातील दूध उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांची घट दरवर्षी येते.
नुकत्याच झालेल्या लम्पीच्या प्रादुर्भावाने राज्यात हजारो जनावरे मृत्युमुखी पडली असताना आता मात्र पशुपालकांसमोर नवे संकट उभ राहिल आहे. सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे व पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे गुरांवर वेगवेगळे विषाणूजन्य आजार उद्भवत असल्याने दूध उत्पादन घटण्याचीही भीती आता व्यक्त होत आहे. यामुळे मात्र पशुपालक त्रस्त झाले असून राज्यातील पशूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं चित्र आहे