Maratha Reservation : संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा कायदा करा; खासदार संजय जाधवांचे मोदींना पत्र
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा, अशी मागणी परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
परभणी : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, यावरून सरकारवर दबाव निर्माण होतांना दिसत आहे. दरम्यान, यावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश येतांना दिसत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली आहे. “संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा, अशी मागणी परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव (Sanjay Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
संजय जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी या समाजाची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचे लोन खेडोपाडी पसरत चालले असून मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रात गावोगावी मराठा समाजाचे उपोषण चालू आहे. विशेष म्हणजे धनगर समाजाचेही आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन चालू आहे. सरकारने या दोन्ही समाजाच्या आरक्षणाची बाब अतिशय गांभीर्याने घ्यावी, असे जाधव म्हणाले आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून कायदा करावा
मात्र, समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा करावा व मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आणि कायम टिकणारे आरक्षण द्यावे. तसेच धनगर समाजालाही आरक्षण देऊन या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी खासदार जाधव यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाचा हा पहिला राजीनामा
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक होत आहे. ठिकठिकाणी नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. दरम्यान, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना देखील आज अडवत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. तसेच राजीनामा देण्याची मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा हा पहिला राजीनामा समजला जात आहे.
आंदोलन तापले...
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बस फोडण्यात आल्या आहेत. तसेच जालना येथील तहसीलदार यांची गाडी फोडण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: