Anandraj Ambedkar : मुख्यमंत्र्यांना सत्तेचा माज, बीड आणि परभणी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : आनंदराज आंबेडकर
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मोर्चे काढले जातात. त्याच्याविरोधात प्रतिमोर्चा काढणं थांबवलं पाहिजे असं आनंदराज आंबेडकरांनी आवाहन केलं.
छत्रपती संभाजीनगर : सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर काळे-निळे वण होते, त्याला मारहाण झाल्यामुळेच कोठडीत मृत्यू झाला होता हे स्पष्ट असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर विधानसभेत हास्यास्पद निवेदन दिलं. त्यांना सत्तेचा माज आला आहे अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली. बीड आणि परभणी हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आनंदराज आंबेडकर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
राज्यात कायद्याचं राज्य राहिलेलं आहे की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर काळे निळे वण होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर विधानसभेत हास्यास्पद निवेदन केले. मुख्यमंत्र्यांना असे उत्तर द्यायला त्यांना सत्तेचा माज आला आहे. या सरकारचं काय करायचं हे अजूनही आम्हाला समजत नाही.
बीडमध्ये प्रतिमोर्चे काढण्याचं काम थांबलं पाहिजे असं सांगत आनंदराज आंबेडकर म्हणाले की, "संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्हीही प्रकरणाची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या माध्यमातून चौकशी करा अशी आमची मागणी आहे. ही दोन्हीही प्रकरणं फास्टट्रॅक कोर्टमध्ये संभाजीनगर येथे चालवावेत, जेणेकरून दबाव येणार नाही."
लोकांच्या असंतोषाचा उद्रेक होऊ देऊ नका
सैफवर हल्ला झाला मग राज्यात सुरक्षित कोण आहे? असा प्रश्न आनंदराज आंबेडकर यांनी विचारला. राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री व्हावा, जेणेकरून अशी प्रकरणं होणार नाहीत अशीही मागणी त्यांनी केली.
बीडमध्ये कोंबिंग ऑपरेशन करून आरोपी का पकडले नाहीत? तुमच्यातील चोरलफंगे चांगले आणि विरोधातील लोक वाईट हे योग्य नाही. महाराष्ट्रात असंतोषाचा उद्रेक होऊ देऊ नका. असंतोषाचा उद्रेक झाला तर संख्याबळ असलेलं तुमचं सरकार कुठे गडप होईल याचा पत्ता लागणार नाही असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
बीडला बदनाम करू नका, मुंडेंचे आवाहन
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणी प्रतिक्रिया दिली. जे लोक आरोप करत आहेत त्यांनी पुरावे दाखवावे. बीड प्रकरणावर योग्यवेळी बोलणार असं मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय. मला काय बदनाम करायचं ते करा, पण बीड जिल्ह्याला नको असं आवाहनही मुंडेंनी केलं.
बीडमधील परिस्थितीमुळे धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपदापासून दूर राहवं लागलं आहे. बीडचं पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असणार आहे. बीडमधील परिस्थितीमुळेच अजित पवारांना पालकमंत्रिपद घेण्याची विनंती आपणच केल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं. तसचं बीडच्या परिस्थितीमुळे आपणच पालकमंत्रिपदाची जबाबदारी नकारल्याचं धनंजय मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं.
बीडची बदनामी मुंडेंनीच केली, दमानियांची टीका
धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बीडची बदनामी धनंजय मुंडे, वाल्मिक कराडनेच केली असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. बीडमधील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा आमचा प्रयत्न असेल असंही दमानिया म्हणाल्या.
ही बातमी वाचा: