Parbhani Crime : धक्कादायक! पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरीला संपवले, हत्येनंतर मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला
Parbhani : पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती-पत्नीला गुन्हा दाखल झाल्यानंतर बारा तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
परभणी : लग्न झालेले असताना देखील दोन वर्षापूर्वी दुसरीशी घरोबा केला. मात्र, दुसऱ्या लग्नानंतर छोट्या छोट्या वादातून घरगुती भांडण सुरु झाले. त्यामुळे नेहमीच्या वादाला कंटाळून पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या (murder) करुन, मृतदेह कॅनॉलमध्ये फेकल्याची घटना परभणी (Parbhani) शहरात समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती-पत्नीला गुन्हा दाखल झाल्यानंतर बारा तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. शिल्पा नामदेव दुधाटे (रा. नेहरुनगर, परभणी) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून, नामदेव दुधाटे आणि स्वाती दुधाटे असे आरोपी पती-पत्नीचे नावं आहे.
दरम्यान, परभणी शहरातील नांदखेडा रोड परिसरातील एका कालव्यामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असता संबंधित महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह कालव्यामध्ये फेकल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे महिलेचा मृत्यू संशयास्पद वाटत होता. दरम्यान या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी मयत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु केले असता, मृतदेह हा परभणी शहरातील नेहरुनगर परिसरातील शिल्पा नामदेव दुधाटे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांनी तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, मागील दोन वर्षापूर्वी शिल्पाचे लग्न लिमला येथील नामदेव दुधाटे यांच्याशी झाला असल्याचे समोर आले. तेव्हापासून शिल्पा आणि नामदेव दुधाटेसोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी नामदेव दुधाटेचा शोध सुरु केला. मात्र, नामदेव दुधाटे हा आपल्या मूळगावी लिमला येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी यांच्या लिमला येथील घरात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना तिथे एका महिलेसह नामदेव दुधाटे पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे नामदेव दुधाटे, स्वाती दुधाटे असल्याचे सांगितले.
घरगुती कारणावरुन भांडण झाल्याने संपवलं
पोलिसांनी यावेळी मयत शिल्पा दुधाटे बद्दल चौकशी केली असता नामदेव दुधाटे याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, दोन वर्षापूर्वी शिल्पासोबत लग्न झाले असल्याचे त्याने सांगितले. लग्नानंतर दोघेही शहरातील नेहरुनगर येथे राहत होते. गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचे घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्यातून आरोपी नामदेव दुधाटे आणि त्यांची पहिली पत्नी स्वाती दुधाटे यांनी मिळून शिल्पाला मारहाण केली. तसेच शिल्पा मेल्याची समजून कालव्यात फेकून दिले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष मृतदेह आढळून आल्यावर अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Parbhani Crime News : परभणी हादरलं! अपहरण करून 14 वर्षीय मुलाला संपवलं; उधारीमुळे धाकटा भाऊ गमावला