Parbhani News : काय सांगता! फक्त 800 मीटर रस्त्यासाठी तब्बल दोन कोटींचा खर्च
Parbhani News : परभणीत एका महागड्या रस्त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे कारणही तसेच आहे. फक्त 800 मीटरचा रस्ता बांधण्यासाठी दोन कोटींचा खर्च आला आहे.
Parbhani News : लोकांच्या मनात सरकारी कामांबद्दल निर्माण झालेली अनास्था, संशयाचे मळभ दूर करण्याची जबाबदारी शासकीय खात्यांची असते असे म्हटले जाते. मात्र, असे होताना फार क्वचितपणे दिसते. परभणीतील सेलूमध्ये फक्त 800 मीटरचा रस्ता बांधण्यासाठी तब्बल दोन कोटींचा खर्च आला आहे. आता या रस्त्याच्या बांधकामावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, अधिकाऱ्यांकडूनही यावर भाष्य केले जात नाही.
मागच्या वर्षी परभणीसह राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्ते, पूल अक्षरशः वाहून गेले. अनेक गावांमध्ये अजूनही रस्ते नाहीत. एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री कोविडचे कारण देऊन निधी नसल्याचे सांगतात आणि दुसरीकडे त्यांच्याच खात्याचे अधिकारी अक्षरशः रस्ते कामांवर उधळपट्टी करताना दिसत असल्याचे समोर आले आहे.
परभणीच्या सेलूत केवळ 800 मीटरच्या रस्ता कामावर तब्बल दोन कोटी दोन लाखांचा खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याचे समोर आले आहे. केवळ 800 मीटरसाठी दोन कोटी एवढा निधी का आणि या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी केली आहे. त्याशिवाय अशोक चव्हाण खराब रस्त्यांसाठी निधी देत नाहीत आणि दुसरीकडे असा वायफळ खर्च करत असल्याने आपण मंत्रालयासमोर कारवाईसाठी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, सेलूचे उपअभियंता नामावार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही शिवाय कार्यालयात ही प्रत्यक्ष भेटले नाहीत.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.