Dried Fish Rate : सुक्या मासळीचे दर कडाडले, खवय्यांच्या खिशाला झळ बसणार
Dried Fish Price : सुकी मासळीची बाजारात आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. मार्गशीष महिना संपल्यानंतर ग्राहकांची पावले सुक्या मासळी बाजाराकडे वळतील आणि त्यांनाही यंदा भाववाढीला सामोरं जावं लागेल.
Dried Fish Price : नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि त्यात वाढलेले पेट्रोल डिझेलचे भाव या महागाईमुळे पालघर (Palghar) जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छिमार (Fisherman) बांधवावर आर्थिक संकट कोसळलं आहे. अशातच सर्वांचीच मागणी असणारे चविष्ट पापलेटही समुद्रात दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे आता मच्छिमार बांधवाना सुक्या मासळीचा आधार उरला आहे. सुकी मासळी (Dried Fish) बाजारात दाखल झाली आहे. पण त्याची आवक कमी झाल्याने सुक्या माशाचेही भाव वाढले आहेत. पालघर जिल्ह्यातील सातपाटी, डहाणू, वसईतील अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर, किल्लाबंदर यासह अन्य भागातील समुद्र किनाऱ्यावर सुक्या माशांचा मोठा बाजार चालतो.
मांदेली, वाकटी, बोंबील, बांगडा, जवळा, करंदी, पापलेट, सुरमई, राव, सुकट, या माशांना हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुकवून, नंतर त्याची विक्री केली जाते. विशेषतः पावसाळ्याच्या आगोदर मासे खवय्ये मोठ्या प्रमाणात सुके मासे घेऊन ठेवतात. कारण हे मासे 3 ते 4 महिने ठिकतात. सुके मासे 200 पासून 500 रुपये किलो अशा प्रमाणात विकले जातात.
परंतु सध्या मासे सुकवताना नैसर्गिक वातावरण पोषक नसल्याने मच्छिमारांचे यात मोठे नुकसान होत आहे. त्यातच यंदा अवकाळी पावासामुळे मासे सुकवले नाहीत. त्याचाही फटका मच्छिमारांना बसला आहे. आता समुद्रात पापलेट हवे तसे मिळाले नाहीत. तसेच मच्छिमारीही पहिल्यासारखी राहिली नाही. आवक कमी झाल्यामुळे, सध्या माशांचे भाव वाढले आहेत. या सर्व खर्चामधून नवीन बोट खरेदीचा खर्च, बोट देखभाल आणि दुरुस्ती खर्च, कर्जाचे हफ्ते, खलाशांचे वेतन, घरखर्च चालवणे हे मच्छिमार यांना अवघड झालं आहे. मच्छिमारांची सर्व मदार आता सुक्या माशांवर आहे. यंदा माशांची आवक कमी झाल्याने, तसेच अवकाळी पावसामुळे सुक्या मासळीचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना सुक्या मासळीचा भाव वाढवावा लागला आहे. त्यामुळे सध्यातरी मार्गशीष असल्याने सुक्या माशांची मागणी कमी आहे. मात्र मार्गशीष संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पावले सुक्या मासळी बाजाराकडे वळतील आणि त्यांनाही यंदा सुक्या मासळीच्या भाववाढीला सामोरं जावं लागेल.
पालघर जिल्हायातून सुकी मासळी घेण्यासाठी नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर, यासह अन्य परिसरातून व्यापारी खरेदीसाठी येतात. एका गोणीत 40 किलो तर एका ट्रकमध्ये 6 टन मासळी नेली जाते. यामुळे मच्छीमार बांधवाना यातून चांगलाच फायदा होतो. परंतु यंदा मासळीचे प्रमाणत कमी झाल्याने मच्छिमारांची अडचण ठरणार आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळते त्याचप्रमाणे मच्छिमारांचे पंचनामे घेऊन, त्यांनाही शासनाने मदत करावी अशी मागणी आता मच्छिमार करत आहेत
सुकी मासळी कधीही वापरात आणली जाऊ शकते. त्यामुळे सुक्या मासळीला खवय्ये नेहमी पसंती देतात. साठवणूक करण्यासाठी अधिकची खरेदी केली जाते. भाव वाढले असले तरी यातून नैसर्गिक संकट ओढवलेल्या मच्छिमार बांधवाना आर्थिक हातभार लागणार हे नक्की.
सुक्या मासळीचा बाजारभाव
पापलेट – आधी– 150 रुपये किलो आता 200 रुपये किलो
सुकट – आधी 150 रुपये किलो आता 200-250 रुपये किलो
बोंबील – आधी 300 रुपये किलो आता 350 ते 500 रुपये किलो
वाकटी – आधी 300 रुपये किलो आता 400 ते 500 रुपये किलो
मांदेली – आधी 100 रुपये किलो आता 150-200 रुपये किलो
करंदी – आधी 150 ते 200 प्रती किलो आता 200 ते 250 रुपये किलो
बांगडा – आधी 8 ते 10 रुपये प्रती नग आता 10 ते 12 रुपये प्रती नग
जवळा – आधी 100 ते 150 रुपये किलो आता 250 ते 300 रुपये किलो
राव – आधी 115 ते 150 रुपये किलो आता 250 रुपये किलो