Maharashtra Palghar News : वाळत घातलेली चटई पाहिली अन् 'हसत खेळत इंग्रजी'ची कल्पना सुचली, पालघरमधील शिक्षिकेचा अनोखा उपक्रम
Maharashtra Palghar News : पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ.रंजना श्रीराम भिसे यांनी इंग्रजी विषयाच्या अध्यापनासाठी एक नविन उपक्रम राबविला आहे हा उपक्रम त्यांना कसा सुचला याची देखील एक मनोरंजक कहाणी आहे
Maharashtra Palghar News : एक चटई वाळत घातलेली दिसली अन् 'हसत खेळत इंग्रजी'ची कल्पना सुचली. पालघरमधील शिक्षिकेच्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा सध्या सगळीकडे होताना दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका रंजना श्रीराम भिसे यांनी इंग्रजी विषयाच्या अध्यापनासाठी एक नवीन उपक्रम राबविला आहे.
आधुनिक शैक्षणिक अध्ययन अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांना सहज आणि सोपं ज्ञान मिळावं यासाठी शिक्षक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. अशा वेळी पालघर जिल्ह्यातील पाड्यावरच्या शाळा देखील मागे नाहीत. डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा डेहणे-तळईपाडा केंद्र-पळे या शाळेतील रंजना श्रीराम भिसे यांनी इंग्रजी विषयाच्या अध्यापनासाठी एक नविन उपक्रम राबविला आहे.
एक दिवस शाळेजवळील आजीनं तारेवर एक चटई धुवून वाळत टाकली होती. रंजना यांचं लक्ष त्या चटईवर गेलं, त्या चटईवर चक्क इंग्रजी A to Z मुळाक्षरं लिहली होती. रंजना यांनी या चटईचा वापर दैनंदिन अध्यापनात मनोरंजक पद्धतीनं करायचा ठरवलं आणि आजीबाईंना चटई देण्याची विनंती केली. आजीनं देखील मनाचा मोठेपणा दाखवून ती चटई शाळेला दिली. त्या नंतरच जिल्हा परिषद शाळा डेहणे-तळईपाडा येथे 'हसत खेळत इंग्रजी' (It's Fun to Learn) या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमात विद्यार्थ्यांना इंग्रजी अक्षरे वाचन आणि लेखन, आपली नावं उड्या मारून दाखवणं, विविध शब्दांचं स्पेलिंग तयार करणं इत्यादी बाबी सहज आणि सोप्या, तसेच मनोरंजकपणे शिकण्यात मदत झाली. पहिली ते चौथी एका शिक्षकेनं राबवलेल्या शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल समग्र शिक्षा महाराष्ट्र यांनी Hop, skip, jump या नावानं Twitter Handle वर घेतली. तसेच इतर जिल्ह्यांतील अधिकारी, शिक्षक यांनी Insta वर Reels बनविले आहेत. महाराष्ट्रातील फेसबुकवरील मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत यासाठी शिक्षण विकास मंच, शालेय शिक्षण तसेच What's app च्या विविध शैक्षणिक ग्रुपवर या उपक्रमाचे कौतुक करण्यात आलं. खरोखर ग्रामीण भागांत, आदिवासी पाड्या पाड्यांवर रंजना यांच्यासारख्या शिक्षकांमुळे, तसेच आजीसारख्या अनेक दानशूर आणि शिक्षणप्रेमी व्यक्तींमुळे शिक्षणाची गंगोत्री अखंड वाहत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :