ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची घरच्या मैदानावर कसोटी, राजकीय नेते आणि कार्यकर्ते मैदानात
निवडणूक लागलेल्या 51 ग्रामपंचायतीपैंकी काही ग्रामपंचायती या आर्थिकदृष्ट्या संपन्न असून जिल्ह्यातील काही दिग्गज नेत्यांच्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत.
पालघर: जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या (GramPanchayat Election) निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून यासाठी पाच नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. ऐन दिवाळीच्या सुमारास निवडणुका लागल्याने यामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी व मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार “लक्ष्मी” दर्शन होण्याची शक्यता आहे. निवडणूक लागलेल्या 51 ग्रामपंचायतीपैंकी काही ग्रामपंचायती या आर्थिकदृष्ट्या संपन्न असून जिल्ह्यातील काही दिग्गज नेत्यांच्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे घरातील ग्रामपंचायतीत विजय मिळविणे जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नेत्यांची कसोटी लागणार असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पालघर जिल्हयातील मुदत संपलेल्या 51 ग्रामपंचायती आणि विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 49 ग्रामपंचायतीमधील 89 जागांसाठी पाच नोव्हेंबरला मतदात पार पडणार असून सहा नोव्हेंबरला मारमोजणी होऊन निकाल लागणार आहेत. यामध्ये अनेक मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश असून मतदानाद्वारे थेट सरपंच पदाची निवड होणार आहे. पालघर तालुक्यातील माहीम, सरावली, खैरापाडा, सालवड, डहाणू तालुक्यातील चिंचणी, बोर्डी आणि तलासरी तालुक्यातील उधवा, कवाडा सारख्या ग्रामपंचातींच्या निवडणुकीत कोण बाजी मारतो यांवर सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे.
ग्रामपंचायतीत सत्ता राखणे प्रतिष्ठेचे
तारापुर औद्योगिक क्षेत्रात येत असलेल्या सरावली, खैरापाडा आणि सालवड ग्रामपंचायत क्षेत्रात एमआयडीसीमुळे प्रचंड नागरीकरण झाले असून या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जातात. मात्र प्रचंड नागरीकरणामुळे प्रदूषणासोबत इतर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सरावली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असून स्थानिकांसोबतच परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. शिवसेना पक्षात फुट पडल्यामुळे इथली निवडणूक चुरशीची होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रभाकर राऊळ आणि कोकण पाटबंधारे विभागाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा व शिवसेनेच्या जिल्हा महीला संघटक वैदेही वाढाण यांच्यासाठी सालवड ग्रामपंचायतीत विजय मिळविणे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पालघर ला लागून असलेल्या माहीम ग्रामपंचायत क्षेत्रात देखील वेगाने शहरीकरण होत असून माजी जिल्हाप्रमुख आणि शिवसेना उपनेते राजेश शहा यांच्यासाठी घरच्या मैदानावर ग्रामपंचायतीत सत्ता राखणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे.
चिंचणी आणि बोर्डी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष निवडणुकीच्या मैदानात
डहाणू तालुक्यातील चिंचणी आणि बोर्डी या मोठ्या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची असून भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी नव्याने नियुक्ती झालेल्या भरत राजपूत यांच्या नेतृत्वात भाजप कशी कामगिरी करतो यांवर पूढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे गणित लागणार आहे. तर तलासरी तालुक्यातील कवाडा ही ग्रामपंचायत आमदार श्रीनिवास वनगा यांच्या घरच्या मैदानावर होत असून या ठिकाणी कायम माकपचे वर्चस्व राहीले आहे. त्यामुळे यावेळी घरातली निवडणूक जिंकणे आमदार वनगा यांच्यासाठी देखील महत्वपूर्ण ठरणार आहे.
माकप आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच
शिवसेना पक्षफुटीनंतर मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चांगले यश मिळवले होते तर शिंदे गटाचा मात्र पुरता धुव्वा उडाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट झाल्याने त्यांची कामगिरी कशी राहते यांवर लक्ष असणार आहे. तर डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी माकप आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच रंगणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहीला असून या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहीले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्व पक्ष पूर्ण तयारीने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता असून यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचा कस लागणार आहे