Palghar Fire : पालघरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, दोन जण गंभीर जखमी; रात्री उशीरा आग आटोक्यात
Palghar Fire News : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर w87 मधील केमिकल कंपनीला (chemical company) भीषण आग लागल्याची घटना घडली.
Palghar Fire News : पालघरमधील (Palghar) बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर w87 मधील केमिकल कंपनीला (chemical company) भीषण आग लागल्याची घटना घडली. ही कंपनी रवीना इंडस्ट्रीज पाठीमागे आहे. या आगीत तीन जण गंभीर भाजले असून त्यांना बोईसरमधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप आगीचं कारण अस्पष्ट आहे. या कारखान्यात जेव्हा मोठा ब्लास्ट झाला तेव्हा जवळपास सहा ते सात किलोमीटर परिसरामध्ये हादरे बसल्याची माहिती मिळत आहे. भीषण आग असल्यामुळे आजूबाजूच्या कंपन्यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
केमिकल कारखान्यांमध्ये टँकर शिरल्यानंतर एका सिक्युरिटी गार्डने स्टो पेटवल्यानं भडका उडून केमिकल टँकरला आग लागून भयंकर स्पोट झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये तेथील गोडाऊनला भीषण आग लागली असून यामध्ये तिघेजण भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बोईसरच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. तर घटनास्थळी चार अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल असून लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहेत.
आगीत जखमी झालेल्यांची नावं
1) फुरखान युनिस खान (वय 27) रा. हरदावली, तालुका बबेरु जिल्हा बांदा, उत्तर प्रदेश सध्या राहणार सत्तर बंगला midc बोईसर
2) अस्पाक नजर मोहम्मद शेख (वय 35 ) रा. सत्तर बंगला बोईसर मूळ रा. दलपुतपूर तालुका जिल्हा बलरामपूर उत्तर प्रदेश
3) काळुदार संतराम वर्मा (वय 50) राहणार सत्तर बंगला बोईसर, सदर व्यक्ती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट नाही. ते किरकोळ जखमी झाले आहेत.
केमिकल टँकरला गळती झाल्यामुळं आग
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर w87 मध्ये लागलेली आग रात्री उशिरा आटोक्यात आली आहे. जवळपास आठ अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली. मात्र, यामध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेमध्ये दोन कामगार 50 टक्क्यांच्या वर भाजले असून त्यांना पहिल्यांदा बोईसरच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील बर्न हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. तर एक कामगार किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर बोईसरमध्येच उपचार सुरू आहेत. केमिकल टँकरला गळती झाल्यामुळं आग लागल्याची माहिती पालघरचे उपविभागीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली आहे.