Mumbai Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुखकर होणार; महामार्गावरील 'या' महत्त्वाच्या कामाला सुरुवात
Mumbai Ahmedabad Highway : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे आणि अपघात मुक्त करण्यासाठी 121 किमी लांबीचा 600 कोटी रुपयाचा सिमेंट कॉक्रिंटकरणाचे काम आता सुरू झाले आहे.
Mumbai Ahmedabad Highway : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरुन (Mumbai Ahmedabad Natiional Highway ) आपण जर प्रवास करत असाल तर ही आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे. डहाणू-गुजरात सीमा येथून मुंबई बॉर्डर पर्यंत आता 121 किमी लांबीच्या महामार्गाचे सिमेंट कॉक्रिंटकरणाचं काम सुरु झालं आहे. काही दिवसांपूर्वीच विरार येथे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महामार्गाच्या सिमेंट कॉक्रिंटकरणाचं काम सुरू करणार असल्याच आश्वासन दिलं होतं. महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त वाहनचालकांना यामुळे मोठा दिलासा मिळेल.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे आणि अपघात मुक्त करण्यासाठी 121 किमी लांबीचा 600 कोटी रुपयाचा सिमेंट कॉक्रिंटकरणाचे काम आता सुरू झाले आहे. महामार्गाच्या व्हाईट टॉपिंगचा काम एक महिन्यात सुरू करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरार येथील एका कार्यक्रमात केली होती. त्याच अनुषंगाने आता कामाला सुरुवात झाली आहे. विरारजवळच्या खानिवडे टोळ नाक्या येथून मुंबई लेनवरुन कामाला सुरुवात झाली आहे. 121 किमी लांबीच्या या रस्त्याला 600 कोटी इतका खर्च येणार आहे. निर्मळ बिल्ड इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड या कंपनीला हे काम मिळाले आहे. काँक्रिटीकरण करण्याच्या पाच मशिन आणल्या जाणार आहेत. पाच ठिकाणाहून हे काम होणार असून, या रस्त्यावर रस्ते ओलांडून प्रवास होवू नये यासाठी घोडबंदर ते तलासरी अच्छाडपर्यंत 10 पादचारी पूल, 3 अंडरपास पूल, कलव्हर्ट, आवश्यकता असेल तेथे पथदिवे अशा उपाययोजना करुन 18 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर ए.के. शर्मा यांनी दिली.
3 नोव्हेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे वसई जनता बँकेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी विरारमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी वसई विरारला येण्याचा मार्ग खडतर असल्याची कबुली दिली होती. या महामार्गाचं नाव मी “डेथ ट्रॅप” ठेवले होते असे सांगितले होते. पावसाळयानंतर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण होतात. त्यामुळे या महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी होत होती. अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळेच या सिमेंट कॉक्रिंटकरणाच्या रस्त्यामुळे आता वाहनचालकांना आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
वर्षानुवर्ष खड्डेमय रस्ते वाहतुक कोंडी यातून हवालदिल झालेल्या वाहनचालकाला आता काही महिने तरी रस्त्याच्या कामकाजामुळे थोडी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.