(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar: डहाणू, तलासरीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट
Palghar: डहाणू-तलासरी तालुक्यातील भूकंपाची मालिका पुन्हा सुरू झाली आहे.
Palghar News: पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू (Dahanu) आणि तलासरी (Talasari) तालुक्यात भूकंपाची श्रृंखला सुरूच आहे, मागील सहा महिन्यांपासून थांबलेली भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांची मालिका पुन्हा सुरू झाली आहे. शनिवारी (27 मे) एका पाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता (Earthquake Intensity) कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले.
भूकंपाच्या धक्क्यांनी मुहूर्त साधला असून पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू (Dahanu), तलासरी (Talasari) तालुक्यातील काही गावं पुन्हा हादरली आहेत. मागील काही वर्षांपासून डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के थांबले होते. मात्र, शनिवारी लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी 5 वाजून 16 मिनिटाला 3.5 रिस्टर स्केलचा, तर 5 वाजून 24 मिनिटांनी जाणवलेल्या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 3.3 रिस्टर स्केल एवढी करण्यात आली .
डहाणू, तलासरी परिसरातील गावांना सतत सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू, घोलवड, बोर्डी, धुदवाडी, तलासरी ही गावं भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहेत. गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, भिलाड आणि दादरा-नगर हवेली (Dadra and Nagar Haveli) येथील सिल्वासापर्यंत भूकंपाचे हादरे बसले आहेत. यात जीवितहानी झाली नसून काही घरांना मात्र तडे गेले आहेत.
डहाणू-तलासरी (Dahanu-Talasari) तालुक्यातील गावांमध्ये शनिवारी जोरदार भूकंप (Earthquake) होऊन जमीन चांगलीच हादरली, हे जोरदार धक्के बसल्याने तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही भयभीत होऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली आणि सुरक्षित स्थळी थोडावेळ थांबल्यानंतर पुन्हा घरात गेले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील महिन्याभरात भूकंपाचा हा दुसरा जोरदार धक्का बसल्याच्या या घटनेने अनेक तर्कवितर्क लावले जात असून चर्चांना उधाण आले आहे. 23 नोव्हेंबर 2022 ला 3.3 रिस्टर स्केलचा धक्का बसला होता, त्यानंतर आज पुन्हा हे धक्के सुरू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात भूकंपाची भीती वाढल्याने नागरिक चिंतेत आहेत.
हेही वाचा: