Pahalgam Terror Attack: सीमेवरील लोकांनी सुरक्षेसाठी घरात बंकर बांधण्यास केली सुरुवात; भारत-पाकिस्तानच्या 'झिरो लाईन'वर काय घडतंय?
Pahalgam Terror Attack: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता असल्याने सीमेवर दहशतीचे वातावरण आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) युद्ध होण्याची शक्यता असल्याने सीमेवर दहशतीचे वातावरण आहे. सीमेवरील भारतीय गावात राहणारे लोक तणावात आहेत. युद्ध कधीही सुरू होऊ शकते आणि त्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवरील युद्धबंदीचे उल्लंघन केले जाईल आणि त्यांची घरे पाकिस्तानचे लक्ष्य बनतील. अशा परिस्थितीत, पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबार आणि शेलिंगपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, सीमेवर असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरात बंकर बांधण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या साजीवार, ख्वाजा बांडी आणि हाजीपीर पोस्टपासून फक्त 2-3 किमी एरियल अंतरावर असलेल्या उरी तहसीलमधील नांबला गावात, लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी कच्चे बंकर बनवण्यास सुरुवात केली आहे.
हाजीपीर भागात वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. यावेळी स्थानिक रहिवाशी हाजी अब्दुल राशीद यांनी सध्याची परिस्थिती सांगितली. युद्ध झाले नाही पाहिजे. युद्ध झाले तर यामध्ये जवानांसोबत नागरिकांचाही मृत्यू होतो. हाजीपीर उरीने याआधी खूप काही सहन केलंय. अनेकजण हे गाव सोडूनही निघून गेले. कधी काही होईल सांगता येत नाही, त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती आहे. मला रात्री झोप लागत नाही. आम्ही येथे 1947 पासून राहतोय. आम्हाला शांती हवीय, असं हाजी अब्दुल राशीद यांनी सांगितले. पहलगाममध्ये जे झालं, ते खूप वेदनादायक होतं, असं व्हायला नको होतं, असंही हाजी अब्दुल राशीद यांनी सांगितले.
पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला-
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत सरकारनं आक्रमक पावलं उचलत मोठे निर्णय घेतले आहेत. भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. या शिवाय पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. मात्र, भारत अजून आक्रमकपणे उत्तर देईल अशी पाकिस्तानला भीती वाटत आहे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सैन्य दलांना फ्री हँड देण्यात आला आहे.
























