Pahalgam Terror Attack: नि. मेजर जनरलचं मोठं भाकीत, मोदी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडणार, सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी!
Pahalgam Terror Attack: निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी मोठं भाकीत केलं आहे.

Pahalgam Terror Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल (29 एप्रिल) लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसेच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत फ्री हँड दिला. तसेच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झालीय. दहशतवादाविरोधात आता आरपारची लढाई सुरू करण्याचा संकल्प मोदी सरकारने केल्याचं दिसतंय. याचदरम्यान, निवृत्त मेजर जनरल अनिल बाम (Retired Major General Anil Bam) यांनी मोठं भाकीत केलं आहे.
निवृत्त मेजर जनरल अनिल बाम (Retired Major General Anil Bam) यांच्याची एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी अनिल बाम म्हणाले की, आता भारतीय सैन्य जे काही करेल, ते भयावह असेल आणि कदाचित पाकिस्तानची शकले (disintegratuon) पडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंत्रिमंडळाच्या सुरक्षा परिषदेची आणि त्यानंतर तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत विशेष बैठक केली आहे. अशा बैठका अचानक होत नाही, सर्व काही ठरल्यानंतर नियोजित पद्धतीने अशा बैठका होतात. त्यामुळे आता जे काही घडेल ते ही निर्णायक असेल, असे मेजर जनरल बाम म्हणाले.
भारताकडून सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी-
आधीच्या सर्जिकल आणि एअर स्ट्राइक मध्ये "एलिमेंट ऑफ सरप्राईज" होता. मात्र आता पाकिस्तान सावध आहे, त्यामुळे काही होईल असा तेव्हाचा एलिमेंट ऑफ सरप्राईज आता उरलेला नाही. त्यामुळे यंदा जे काही होईल ते सर्जिकल व एयर स्ट्राइकच्या पुढचा असेल, म्हणजेच तो कदाचित अर्ध किंवा पूर्ण युद्ध अशा स्वरूपाचा असेल, अशी शक्यताही मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केली. सध्या भारत काय करेल, या चिंतेने पाकिस्तान तडफडतोय. मात्र, पाकिस्तानला तो सरप्राईज एलिमेंट केव्हा द्यायचा याचा निर्णय भारतीय सैन्यच करेल, असेही मेजर जनरल बाम म्हणाले.























