कंडक्टरच्या गणवेशातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करणं पडलं महागात, महिला कंडक्टर निलंबित
Osmanabad News Update :खाकी वर्दीत व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत महिला कंडक्टरला एस टी महामंडळाने निलंबित केलं आहे. मंगल सागर गिरी असे निलंबित करण्यात आलेल्या महिला कंडक्टरचं नाव आहे.
उस्मानाबाद : ड्युटीवर असताना रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला चांगलंच महागात पडलं आहे. एसटी महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरला निलंबित केले आहे. मंगल सागर गिरी असं निलंबित करण्यात आलेल्या महिला कंडक्टरचं नाव आहे. गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्यामुळे मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महामंडळाने वाहतूक कंट्रोलरला देखील याच कारणाने निलंबित केलं आहे. कल्याण कुंभार असं वाहतूक कंट्रोलरचं नाव आहे.
निलंबित महिला कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. गिरी या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे वेगवेगळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलात. परंतु, गिरी यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर व्हिडीओ करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. स्वतःचे व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत महांडळाकडून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
अलिकडे सोशल मीडिया (Social Media) च्या माध्यमातून तरुण- तरुणी प्रसिद्धी मिळवत आहेत. रिल्स बनवण्याची सध्या खूपच क्रेझ आहे. हे रिल्स बनवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळण्यासाठी अनेक जण वाटेल ते करत आहेत. परंतु, प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. असाच प्रकार या महिला कंडक्टरसोबत घडला आहे. एसटी महामंडळाच्या गणवेशात व्हिडीओ काढून तो या महिला कंडक्टरने इन्स्टाग्रामवर अपलोड केला. आधीच सोशल मीडियावर क्रेझ असलेल्या या महिला कंडक्टराचा हा व्हिडीओ देखील खूप व्हायरल झाला. परंतु, प्रसिद्धीच्या नादात आपण काय करतोय याचे भान नसलेल्या या महिला कंडक्टरवर महामंडळाने थेट निलंबनाची कारवाई केली. एवढंच नाही तर या महिला कंडक्टरने केलेल्या व्हिडीओमुळे वाहतूक कंट्रोलरवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून रातोरात स्टार झालेले अनेक लोक आतापर्यंत पाहिले आहेत. परंतु, व्हिडीओ बनवल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेल्या या महिला कंडक्टरची सध्या जोरदार चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या