Dharashiv Rain: धाराशिवमध्ये जोरदार पावसाला सुरुवात, समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला, धरणसाठ्यातही होतेय वाढ
Dharashiv Rains: धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून धरणसाठ्यात वाढ होत असल्याचे जलसंपदा विभागाच्या माहितीवरून समोर येते.
Dharashiv News: राज्याच्या विविध भागात मुसळधार पडत असून धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात दुपारी ५.३० वाजल्यापासून तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने धरण पाणीपातळीत वाढ होणार असून पिकांना बळ मिळणार आहे. आज हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्याला हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला होता.
धाराशिवमध्ये पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. जुनच्या सुरुवातीला जिल्ह्यात पाऊस झाल्याने अनेकांनी खरीप पेरण्यांचा श्रीगणेशा केला खरा. मात्र, पुढे समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसला होता. आता पावसाने हजेरी लावल्याने पेरणी केलेल्या पिकांना बळ मिळण्याची शक्यता आहे.
धरणपातळीत होणार वाढ
धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये आता पाणीपातळीत वाढ होत असून निम्न तेरणा धरण १४..०१ टक्के भरले आहे. दरम्यान, जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उजनी धरणात अजूनही शुन्य टक्केच पाणीसाठा आहे. आता समाधानकारक पाऊस झाला तर धरणसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सीना कोळेगाव धरणही अद्याप शुन्याच्या वर आले नसून जिल्ह्यातील उर्वरित धरणे १५ टक्क्यांच्या आसपास भरली असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
प्रादेशिक हवामान केंदानुसार मराठवाड्यात असा असेल पाऊस
मराठवाड्यात पुढील दोन दिवस छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली, नांदेड, जालना, परभणी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. आज (दि ३) काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून हवामान ढगाळ आहे.
हेही वाचा:
विदर्भात पावसाची हुलकावणी, कोणत्या जिल्ह्यात किती तूट? हवामान विभागानं दिली सविस्तर माहिती