Pollution : आता खापरखेडा वीज प्रकल्पातील राखेचे पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनमध्ये लीकेज
राख मिश्रीत पाणी वाहून नेणारी पाईपलाईन ही खूप जुनी असून सतत राख मिश्रीत पाणी वाहून नेत असल्याने जागोजागी सडली असल्याची माहिती आहे. काही ठिकाणी तर अनेक वर्षांपासून लहान लिकेज असल्याचे नागरिक सांगतात.
नागपूरः कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील राखेचा बंधारा फुटल्यानंतर बंधारा फुटल्याची घटना घडली. त्यानंतर शेजारच्या 6-7 गावांतील नागरिक कधीच विसरणार नाही असे त्यांचे नुकसान झाले. शिवाय पंचक्रोशीत राख मिश्रित पाणी पसरल्याचे आणि त्यामुळे परिसरात झालेल्या पर्यावरणीय हानी आणि प्रदूषणाचे प्रकरण ताजे असताना, आता खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातील राखेच्या पाईपलाईन मधून लिकेज सुरू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून एका पाईपलाईनच्या माध्यमातून औष्णिक वीज केंद्रातील राख मिश्रित पाणी वीज केंद्राच्या वारेगाव येथील राखेच्या बंधाऱ्यात पोहोचवले जाते. मात्र आता त्याच पाईपलाईन मधून लिकेज होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राख मिश्रित पाणी परिसरातील नाल्यांमध्ये आणि अखेरीस कोलार नदीमध्ये मिसळला जात असल्याचे समोर आले आहे. कोलार नदीचे पाणी पुढे कन्हान नदीमध्ये वाहून जात असते. नागपुरच्या अनेक भागात कन्हान नदीच्या पाण्यावर पाणी पुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे ही गळती वाढल्यास नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा संकट उभा होईल. तसेच भोवती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात या पाण्यामुळे प्रदूषण होऊ शकते. म्हणून प्रशासनाने या गळतीकडे वेळीच लक्ष देऊन याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
जुनी पाईपलाईन सडली
राख मिश्रीत पाणी वाहून नेणारी पाईपलाईन ही खूप जुनी असून सतत राख मिश्रीत पाणी वाहून नेत असल्याने जागोजागी सडली असल्याची माहिती आहे. काही ठिकाणी तर अनेक वर्षांपासून लहान लिकेज असल्याचे नागरिक सांगतात. मात्र याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोलार नदीच्या पुलावर राखेचे चिखल
कोलार नदीच्या पुलावरून जाणाऱ्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील राखेची पाईपलाईन मधून गेले 2 दिवस गळती सुरू होती. सध्या ती गळती बंद झाली असली तरी दर तासाला शेकडो लिटर राख मिश्रित पाणी पाईपलाईन मधून कोलार नदीमध्ये तसेच परिसरात वाहिल्यामुळे कोलार नदीच्या पूलावर तसेच अवतीभवतीच्या परिसरात अनेक इंच जाडीचे चिखलयुक्त राखेचे थर साचले आहेत... तसेच मोठ्या प्रमाणावर राख कोलार नदीमध्ये ही मिसळली गेली आहे. त्यामुळे कोराडी औष्णिक वीज केंद्रातील राखेच्या बंधाराच्या दुर्घटनेनंतर परिसरात सुरू झालेली पर्यावरण हानी आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात वीज निर्मिती मधून निर्माण होणारी लाखो टन राख पाईपलाईनच्या माध्यमातून "वारेगाव" येथील राखेच्या बंधार्यात साठवली जाते.
दोन दिवसांपासून सुरु होती गळती
मात्र, वारेगाव च्या राखेच्या बांधापासून काही अंतरावर जिथे राखेची पाइपलाइन कोलार नदीचे पूल ओलांडते. त्या ठिकाणी पाईपलाईन मधून गेले दोन दिवसांपासून राखेची गळती सुरू होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर राख पसरत होती. सध्या राखेची गळती अधिकाऱ्यांनी बंद केली असली. तरी झालेल्या पर्यावरणीय हानीचे चित्र भयावह आहेत. गळती असलेल्या ठिकाणाच्या जवळपास जमिनीवर अनेक मीटर अंतरापर्यंत राखेचं चिखल पसरलेला असून कोलार नदीच्या प्रवाहाच्या माध्यमातून तो पुढे कन्हान नदीपर्यंत पोहोचत आहे, हे विशेष.
कोराडीची घटना...
कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा शनिवारी सकाळी कोसळला. त्यामुळे सर्व जोड रस्ते पाण्याने भरले होते. खसाळा, म्हसळा, कवठा, खैरी आदींसह परिसरातील गावांमध्ये फ्लाय राखेचे पाणी वाहत आहे. फ्लाय ऍशच्या पाण्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे लाखो टन राख वाहुन गेली. परिसरातील नदी, नाले प्रदूषित झाले होते. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राखेच्या बंधाऱ्यात पाणी भरले होते. मात्र सकाळी 10 ते 10.30 दरम्यान कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा राख बंधारा फुटला काही वेळातच सर्वत्र राख झाली. पुरामुळे पाणी सोडण्यात आले होते. त्या पाण्यात राख मिसळून परिसरातील गाव आणि शेतीमध्येही सर्वत्र राख पसरली होती. पाणी उतरल्यावर शेतकऱ्यांना शेततीमध्ये फक्त राखच दिसणार असल्याचे चित्र आहे. तर अनेकांची पिके या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.