पंतप्रधान मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा, नमाज पठण करु द्या, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी
राष्ट्रवादीच्या या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा, नवकार या मंत्रांचे पठण करण्याची परवानगी मागितली आहे.
NCP Leader Wrote Letter to Amit Shah : 'पंतप्रधानांच्या घरासमोर हनुमान चालिसा आणि नमाज पठणाची मुभा द्या' अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी फहमिदा खान यांनी केली आहे. या मागणीसाठी फहमिदा खान यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. राष्ट्रवादीच्या या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालिसा, दुर्गा चालिसा, नवकार या मंत्रांचे पठण करण्याची परवानगी मागितली आहे.
सध्या ‘हनुमान चालिसा’ पठणाचा वाद जोर धरत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर ‘हनुमान चालिसा’ पठणाचा आग्रह धरला होता. यानंतर झालेल्या गोंधळामुळे दोघांनाही अटक करण्यात आली आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. यानंतर आता राष्ट्रवादीच्या या महिला नेत्याचं पत्र चर्चेत आलं आहे.
काय म्हणाल्या फहेमीदा हसन?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या या पत्रात फहेमीदा हसन म्हणतात, मला माझ्या प्रिय देशाच्या लाडक्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालिसा, दुर्गा चालिसा, नवकार मंत्र, गुरु ग्रंथ आणि नोविनो यांचे पठण करण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठीचा दिवस आणि वेळ देखील आपण सुचवावा.’ फहेमीदा हसन या राष्ट्रवादी पक्षाच्या कांदिवली विभागाच्या कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी थेट अमित शाह यांना लिहिलेले हे पत्र चर्चेत आले आहे.
हनुमान चालिसा वाद शिगेला
हनुमान चालिसा वाचण्यावरुन सुरु झालेला वाद शिगेला पोहोचला आहे. नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. याच्या काही वेळानंतर खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी नवनीत राणा आणि त्याचे पती रवी राणा यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयासमोर हजार केले असताना त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संबंधित बातम्या