कारागृहात बसूनही हनुमान चालिसा वाचू शकता; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला
Sanjay Raut on Rana : मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे, असा आरोपही राऊतांनी केला आहे.
Sanjay Raut on Rana : महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्यानं होते, असं म्हणत संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीनं अशी कारस्थानं करत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होतो, असं ते म्हणाले. तसेच, पुढे बोलताना मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "हा न्यायालयाचा निर्णय. याच्याशी सरकारचा संबंध नाही. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्यानं होत आहे. काल किंवा अलिकडच्या काळात पोलिसांनी जे चित्र पाहिलं. राणा दाम्पत्याच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे, कारस्थान आहे. त्यांच्यावर पोलिसांनी लावलेली कमल योग्य आहेत असं मला वाटतं. अशा प्रकारे राज्य उठवण्याचा कट धर्माच्या नावावर महाराष्ट्रात नाही, तर कुठेही होऊ नये. पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा अन्य राज्य असतील, अशाप्रकारे जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीनं अशी कारस्थानं करत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होतो. हे काही आज होत नाही. भीमा-कोरोगावमध्ये अनेक विचारवंत, लेखक, कवी यांना अटक करुन राज्य उठल्याचा कट त्यांच्यावर मागच्या सरकारनं लावला आहे. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला शिकवू नये. हे मोठं षडयंत्र आहे."
"सदावर्ते प्रकरणातही हेच झालंय. राज्य उठवायचं, राज्य अस्थिर करायचं. तिथे पवारसाहेबांच्या घरी ते गेले, इथे मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न ते करत होते. पोलीस आहेत ठिक आहे, पण शिवसैनिक प्रतिकार करतात. मग संघर्ष निर्माण करायचा, त्यानंतर दंगल सदृश परिस्थिती निर्माण करायची. एकदा मनाप्रमाणे घडलं की, राज्यपाल त्यांचेच आहेत. मग राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी करायची, असा प्रकार सुरु आहे.", असं संजय राऊत म्हणाले.
तुम्ही घुसून वाचणार मग आम्हीही घुसू. तुमच्या बापाचं राज्य आहे का? : संजय राऊत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असतील, हे सगळे हे राज्य सक्षमपणे पुढे नेत आहेत. त्यामुळे यांचा प्रत्येक कट उधळला जात आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "हनुमान चालिसाला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाहीये. हनुमान चालिसाला कोणी विरोध केला? काल ते जेलमध्ये होते, तिथे वाचू शकतात. आता त्यांना कुठल्यातरी जेलमध्ये पाठवलंय. तिथे त्यांनी वाचावी हनुमान चालिसा. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन वाचावी, एखादं मोठं सभागृह घ्यावं तिथे त्यांनी वाचावं. या महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक हिंदुंच्या कार्यक्रमाला कोणीच विरोध केलेला नाही. पण तुमचा जो हट्ट आहे, मी मातोश्रीत घुसून वाचेल, तुम्ही घुसून वाचणार मग आम्हीही घुसू. तुमच्या बापाचं राज्य आहे का?", असं राऊत म्हणाले.