Navi Mumbai : अन् तो पोलिसांच्या हातातूनच निसटला? नायजेरियन नागरिक आणि पोलिसांमध्ये नेमकं काय झालं? पाहा व्हिडिओ
Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांची नायजेरियन नागरिक आणि ड्रग्स तस्करांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये एक नायजेरियन नागरिक पळून गेला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिसांकडून नायजेरियन नागरिक आणि ड्रग्स (Drugs) तस्करांविरोधात धडक मोहीम राबवण्यात आली आहेत. शनिवार रात्रापासून एकूण 15 नायजेरियन नागरिकांना एन.आर.आय पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान एका नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला. पण या गोष्टीला पोलिसांकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. त्यामुळे तो पोलिसांच्या ताब्यातून निसटून गेला की पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतलं हे अद्याप समोर आलेलं नाही.
मुंबईसह राज्यात सध्या ड्रग्ज तस्करींवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांकडून धडक कारवाया करण्यात येत आहेत. अशीच धडक कारवाई नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आली. तर या कारवाईमध्ये पोलिसांना अनेक पुरावे सापडले असल्याची माहिती देखील देण्यात आलीये.
नेमकं काय घडलं ?
शनिवार (7 ऑक्टोबर) रोजी 15 नायजेरियन नागरिकांना एन.आर.आय पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर यामधील एका नायजेरियन नागरिकाकडे 84 लाख 85 हजार रुपयांचे कोकेन आणि एमडी ड्रग्स सापडलेत. या नायजेरियन नागरिकाविरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्याच्या पत्त्यावर पोहचले. पण या कारवाईदरम्यान एक नायजेरियन नागरिक पोलिसांच्या हातून पळून जाण्यात यशस्वी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला पोलिस गाडीकडे घेऊन जात असताना तो पोलिसांच्या हातातून निसटून पळून गेला. त्याच्यामागे पोलिसांचा संपूर्ण ताफा धावू लागला. पण अद्याप पोलिसांनी तो पळून गेला असल्याच्या माहितीला दुजोरा दिला नाही. हा नागरिक पळून जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये 14 नायजेरियन नागरिकांचा व्हिजा संपला असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. तर त्यांना देश सोडून आदेश देण्यात आलेत. त्यामुळे पोलिसांकडून सुरु असलेल्या या धाडसत्रात आणखी कोणत्या गोष्टी पोलिसांच्या हाती लागणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच हा नागरिक पुन्हा पोलिसांच्या हाती लागला का की तो पळूनच गेला या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडून काय येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान राज्यात सुरु असलेल्या ड्रग्ज तस्करीच्या विरोधतल्या कारवाईंच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.