Panvel Municipal Corporation : पनवेल पालिकेला 355 कोटी रुपयांचा निधी मंजूर, पाणी पुरवठ्यासह सांडपाणी व्यवस्थापनाचं काम होणार
पनवेल महानगरपालिकेला (Panvel Municipal Corporation) 355.74 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. पाणी पुरवठा (Water supply) आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
Panvel Municipal Corporation : पाणी पुरवठा (Water supply) आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेला (Panvel Municipal Corporation) 355.74 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानं लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. नागरी संस्थांच्या हद्दीतील काही भागात चांगल्या नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. 23 ग्रामपंचायतींमधील 29 गावांमध्ये पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापणाचे काम करण्यात येणार आहे.
अटल मिशन फॉर रिजुव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) योजनेअंतर्गत या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. प्रस्तावित मुख्य पायाभूत कामं पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. या योजनेद्वारे गावांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी 100 किलोमीटरहून अधिक पाण्याची लाईन टाकण्यात येणार आहे. याशिवाय या योजनेंतर्गत तब्बल 44 पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. पाताळगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती गणेश देशमुख यांनी दिली.