(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Handloom Day 2024 :...म्हणून तेव्हा प्रत्येक घरात खादी बनवायला सुरुवात झाली होती! 'राष्ट्रीय हातमाग दिन' निमित्त इतिहास, उद्देश जाणून घ्या
National Handloom Day 2024 : एका चळवळीमुळे भारतातील जवळपास प्रत्येक घरात खादी बनवायला सुरुवात झाली. 'राष्ट्रीय हातमाग दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या..
National Handloom Day 2024 : शेतीनंतर हातमाग हे भारतातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे क्षेत्र आहे. हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम आणि लोकर पासून सुंदर साड्या आणि इतर वस्तू तयार करतात. हातमाग हे भारतातील उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. हा दिवस हातमाग समुदायाचा आणि आर्थिक विकासातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आज ७ ऑगस्ट.. दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. जाणून घ्या या दिनाचा इतिहास.. उद्देश.. सर्वकाही..
...ज्यामुळे प्रत्येक घरात खादी बनवायला सुरुवात झाली
1905 साली एक चळवळ सुरू झाली. 'स्वदेशी' चळवळीच्या स्मरणार्थ 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. परदेशी मालावर बहिष्कार घालणे हा त्याचा उद्देश होता. या चळवळीमुळे भारतातील जवळपास प्रत्येक घरात खादी बनवायला सुरुवात झाली. हातमाग उद्योग आजच्याच नव्हे तर प्रदीर्घ काळापासून हातमाग कारागिरांना रोजगार देत आहे, पण तरीही या कारागिरांची स्थिती फारशी चांगली नाही. हा दिवस पहिल्यांदा 7 ऑगस्ट 2015 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 2024 रोजी 10 वा हातमाग दिन साजरा केला जात आहे.
कृषी क्षेत्रानंतर हातमाग क्षेत्राचा मोठा वाटा
भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्रानंतर हातमाग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात हातमागाचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. तसेच, हा दिवस साजरा करण्याचा उद्देश भारतीय विणकर आणि कामगारांनी बनवलेल्या वस्तूंचे कौतुक करणे हा आहे. हातमाग दिनाचा उद्देश लघु उद्योगांना चालना देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. 2015 मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईमध्ये राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला. हातमाग म्हणजे एक यंत्रमाग ज्याचा वापर वीजविना कापड विणण्यासाठी केला जातो.
भारतातच नाही तर परदेशातही मागणी
हातमागाच्या उत्पादनांना भारतातच नाही तर परदेशातही मागणी आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. फॅशन शो, हस्तकला प्रदर्शने, परिसंवाद, कार्यशाळा याद्वारे लोकांना हातमागाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला जातो. हातमागाच्या उत्पादनांची रचना आणि रंग त्यांना खास बनवतात.
हेही वाचा>>>
National Doctor's Day 2024 : ...अन् बघता बघता लोकांनी 'त्यांना' देवमाणसाचा दर्जा दिला! 'डॉक्टर्स डे' चा इतिहास काय सांगतो? महत्त्व जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )