Yavatmal : सहलीला आलेल्या मुलांचे 18 मोबाईल चोरले, पण ते 4G असल्याने चोर फसला; मोबाईल तर खपले नाहीतच पण पोलिसांनीही वरात काढली
Crime : यवतमाळमध्ये एका चोराने शाळेच्या मुलाचे मोबाईल तर चोरले, पण ते 4G मोबाईल असल्याने कुणीही खरेदी केले नाहीत. नंतर हा चोर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
नाशिक : चोरी केली आणि त्याचा काहीच उपयोग झाला नाही, चोरी केलेली वस्तू जर बाजारात खपलीच नाही तर त्या चोराला किती वेदना होतील? बर तेही ठिक आहे, पण मग त्याहूनही नशीब फुटकं निघालं आणि ती चोरी सापडली तर काय करावं त्यानं? अशीच काहीशी परिस्थिती यवतमाळच्या एका मोबाईल चोरावर आली. सहलीला आलेल्या शाळेतल्या मुलांचे मोबाईल तर चोरले, पण ते 4 G असल्याने ते कुणीही विकत घेईनात आणि त्याच चोरीमुळे पोलिसांच्याही (Nashik Police) हाती तो लागल्याची घटना घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक असे एकूण 95 जण सहलीच्या निमित्ताने 25 डिसेंबरला नाशिक शहरात दाखल झाले होते. रात्री गोदा घाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेत मुक्कामासाठी थांबलेले होते. त्यावेळी झोपी गेलेल्या वीस विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीस गेले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शोध पथकाकडून याबाबत तपास सुरू असताना शफीक तौफिक शेख या 36 वर्षीय सराईत मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराने ही चोरी केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी नाशिकच्या द्वारका परिसरातून त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चोरीचे एकूण 18 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
कुणीही मोबाईल विकत घेईना
विशेष म्हणजे चोरलेले मोबाईल हे फोर जी असल्याने चोराची मोठी अडचण झाली होती. त्याच्याकडून ते फोन कोणी विकत घेत नसल्याने त्याने आपल्या घरीच ते ठेवले होते असे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी शफीक तौफिक शेखने यापूर्वी देखील 40 मोबाईल चोरी केले असल्याचं उघड झालंय.
साडेपाच लाखांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव येथील मोबाईल दुकानातून साडेपाच लाखांहून अधिक रुपयांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये हा प्रकार घडला होता. त्यानंतर या प्रकरणातील चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा देत परराज्यात पळ ठोकला होता. अखेर या संशयित आरोपींना चार महिन्यानंतर झारखंड राज्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे हे आरोपी बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी विशेष पथक नेमून त्यांना बेड्या ठोकल्या आहे.
ही बातमी वाचा: