(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमध्ये बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, एक जण जखमी; वनविभागाची शोध मोहीम सुरु
नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात बिबट्यानं नागरिकांवर हल्ला केला आहे. यात एक नागरिक जखमी झाला असून बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
नाशिक : अलिकडे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव वाढला आहे. प्राण्यांचा जंगलातील अधिवास कमी होत असल्याने ते अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरकताना दिसत आहेत. नुकतेच नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात बिबट्याचं दर्शन झालं आहे. सदगुरु नगर परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हा बिबट्या दिसला असून बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याचीही माहिती मिळत आहे. या हल्ल्यात सुधीर क्षत्रिय हे नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बिबट्याच्या दर्शनानंतर स्थानिक नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ रोडवरील बिवट्या असलेल्या ठिकाणी पोहोचले असून सध्या बिबट्याचा शोध सुरु आहे.
एकीकडे नाशिकमध्ये मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे चंद्रपूरमधील थर्मल पॉवर स्टेशन परिसरात स्थानिकांकडून वाघाचे फोटो काढण्यासाठी केलेली उठाठेव कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
चंद्रपूरमधील थर्मल पॉवर स्टेशन परिसरात स्थानिकांना वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहिल्यानंतर काही हुल्लडबाजांनी वाघाच्या अगदी 15 फुट अंतरावरुन त्याचे फोटो काढण्याचं धाडस करण्यात आल्याचं समोर आलंय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ आता लगतच्या परिसरात संचार करत आहेत. परंतु, या वाघांचे फोटो काढण्यासाठी नियमांची पायमल्ली केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुलांना जन्म द्या अन् अकरा लाखांच्या बोनससह एका वर्षाची सुट्टी मिळवा! 'या' कंपनीचा मोठा निर्णय
- बायडेन यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, फोटो शेअर करत दिली माहिती
- WFH in Corona : वर्क फ्रॉम होमचं हवं! 82 टक्के लोकांना ऑफिसला परतायची इच्छा नाही, अभ्यासात उघड
- कॅनडाचे पंतप्रधान अज्ञातवासात, आंदोलक पेटले; काय आहे प्रकरण?