नाशिकमध्ये पीपीई किट घालून दागिन्यांची दुकानं फोडण्याचा प्रयत्न, चोरीचा डाव फसला
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळेच अपरिहार्यतेने न्यू नॉर्मल आयुष्य जगत आहेत. या न्यू नॉर्मलमध्ये चोरीच्याही नव्या पद्धती चोरट्यांकडून अवलंबल्या जात आहेत. नाशिकमध्ये पीपीई किट घालून चोरट्यांनी दागिन्यांची दुकांन फोडण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : नाशिक शहरात आज दोन दागिन्यांची दुकानं फोडण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेत चोरटे पीपीई किट घालून चोरी करण्यासाठी आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. परंतु दोन्ही ठिकाणी चोरट्यांचा डाव फसला.
जेलरोड भागातील तेजस्वी ज्वेलर्स आणि काठे गल्लीतील मोहिनीराज ज्वेलरी शॉप आज पहाटे फोडण्याचा प्रयत्न झाला. जेलरोड इथे स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला तर काठे गल्लीत तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आलं. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.
नाशिक शहरातील जेलरोड आणि काठेगल्ली परिसरातील दोन ज्वेलरी शॉप फोडण्याचा प्रयत्न, कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेत चोरटे पिपीई किट घालून आल्याच सिसिटिव्ही फुटेजमध्ये कैद, पोलिसांकडून पुढील तपास सुरु @abpmajhatv pic.twitter.com/SMo8FQEJSV
— Pranjal Kulkarni (@AbpMajhaNashik) August 13, 2020
साताऱ्यातही पीपीई किट घालून दुकानावर दरोडा
याआधी महिनाभरापूर्वी साताऱ्यातही अशीच घटना घडली होती. फलटणमध्ये पेठेतील हिराचंद कांतीलाल ज्वेलर्सच्या दुकानातून 78 तोळे सोने लंपास केले. विशेष म्हणजे या चोरट्यांनी कोरोनाबाधित रुग्णांना बरे करणारे डॉक्टर ज्या पद्धतीने संपूर्ण शरीर झाकतात त्या पद्धतीने त्यांनी डोक्याला प्लास्टिक पॅकबंद टोपी, मास्क, प्लास्टिक जॅकेट, हॅन्डग्लोज असे परिधान केल्याचे दिसत आहे. या चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या होत्या.
कडक लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळाली. तुरळक पोलीस ठाणे असतील की त्याठिकाणी लॉकडाऊनचे नियम मोडण्याचे गुन्हे वगळता गुन्हा दाखल झाला. मात्र जसजशी सूट मिळत गेली, तसतसे विविध प्रकारचे गुन्हे दाखल होताना पाहायला मिळू लागले.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळेच न्यू नॉर्मल आयुष्य जगत आहेत. आता या न्यू नॉर्मलमध्ये चोरीच्याही नव्या पद्धती चोरट्यांकडून अवलंबल्या जात आहेत. कोरोनामुळे मास्कचा वापर अनिवार्य असल्यामुळे चोरटेही मास्कच मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे दिसू लागले आहे. केवळ मास्कच नाही तर त्यापुढे जाऊन पीपीई किट घालून चोरी करत आहेत.