(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : सुपरवायझरच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येपूर्वीचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल
Nashik News: किरण पुराणे हा कर्मचारी नाशिकच्या पंचवटी विभागात कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी त्याने याबाबत व्हॉट्सअॅप मॅसेज तयार केला होता.
Nashik News Update : नाशिकमध्ये घंटागाडी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. किरण पुराने असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वीचा किरणचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घंटागाडीचा ठेका काही खासगी ठेकेदारांमार्फत चालविला जातो. यात चालक आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. यातील पंचवटी विभागात काम करणाऱ्या किरण पुराने या कर्मचाऱ्याने ठेकेदारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
किरण पुराने हा कर्मचारी नाशिकच्या पंचवटी विभागात कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी त्याने याबाबत व्हॉट्सअॅप मॅसेज तयार केला होता. ज्यामध्ये काही घंटागाडी निरीक्षक आपल्याकडे ठराविक रक्कमेची मागणी करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करत आहे, असं किरण याने शेअर केलेल्या मॅसेजमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, आज सकाळी उघडकीस आलेल्या या आत्महत्येच्या घटनेनंतर मृत घंटागाडी कर्मचाऱ्याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. मॅसेजमध्ये नामोल्लेख केलेल्या संशयित निरीक्षकांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कारवाईकडे नातेवाईकांचे लक्ष लागले आहे.
नाशिक मनपा घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड म्हणाले की, "आज सकाळी आत्महत्येबाबत माहिती समजली. आत्महत्या केलेला कामगार गेल्या 15 दिवसांपासून कामावर नसल्याचे समजते. शिवाय तो गेल्या काही दिवसांपासून डिस्टर्ब असल्याची माहिती मिळाली आहे. घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत पोलीस तपासात पुढे येईल."
नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते महादेव खुडे म्हणाले, किरण हा त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्या आशा जाण्याने कुटुंबाला मोठा फटका बसला आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी. शिवाय नाशिक मनपाच्या आरोग्य विभागावरही कारवाई करण्यात यावी. तसेच किरण यांच्या कुटुंबियांस 25 लाख रुपये भरपाई देण्यात यावी."