(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : आपचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांना अटक; शिक्षणाधिकाऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप
Nashik News : आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
Nashik News : आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांना अटक करण्यात आली आहे. महिला शिक्षण अधिकाऱ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी जितेंद्र भावे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं.
आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी एका फेसबुक लाईव्ह दरम्यान, मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह शिक्षण विभागावर ताशेरे ओढले होते. तसेच लाईव्ह दरम्यान सुनीता धनगर यांच्यां संदर्भात एकेरी उल्लेख करत त्या भ्रष्टाचारी असल्याचाही उल्लेख केला होता. मनपा शिक्षणाधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना खडे बोलही सुनावले होते. त्यावेळी बोलताना 'काम जमत नसले, तर घरी बसून धुणी भांडी करावीत', असं आक्षेपार्ह वक्तव्य जितेंद्र भावे यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
सध्या राज्यात पेपरफुटी प्रकरण चांगलंच गाजत आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच म्हाडा, टीईटी, आरोग्य भरती परीक्षा, एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटीची प्रकरणं समोर आली आहेत. या सर्व प्रकरणी जितेंद्र भावे यांनी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रहार केले होते. याप्रकरणी जितेंद्र भावेंसह त्यांच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. फेसबुक लाईव्ह दरम्यान, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना कामानिमित्त भेटण्यासाठी गेलो होतो, पण त्या वेळ देन नसल्याचा आरोपही भावेंनी केला होता.
जितेंद्र भावे आहेत कोण?
जितेंद्र भावे हे नाशिकचे आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आहेत. याआधी हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन करून जितेंद्र भावे चर्चेत आले होते. नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात बिलाच्या मुद्द्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांनी रुग्णालयात जाऊन अंगावरील कपडे काढत आंदोलन केलं होतं. तसंच या संपूर्ण प्रकरणाचं फेसबुक लाईव्ह केल्याने याची नाशिकमध्ये एकच चर्चा रंगली होती.
काय होतं हे प्रकरण?
नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णाचे नातेवाईक आणि प्रशासन यांच्यात बिलाच्या मुद्द्यावरुन वाद झाला होता. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाने नाशिकमधील आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर जितेंद्र भावे आणि संबंधित नातेवाईकांनी दुपारी रुग्णालयात जात आपल्या अंगावरील कपडे काढत अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं होतं. तसंच या संपूर्ण प्रकरणाचं जितेंद्र भावे यांनी फेसबुक लाईव्ह देखील केलं होतं. या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाने जितेंद्र भावे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सुरुवातीला मुंबई नाका पोलिसांनी भावे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर जितेंद्र भावे यांच्या समर्थकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली होती. जितेंद्र भावे यांच्या आंदोलनानंतर सोशल मीडियामध्ये हॉस्पिटल आणि पोलिसांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांच्या या आंदोलनासमोर वोकहार्ट रुग्णालय प्रशासन अखेर झुकलं. रुग्णालयाने जितेंद्र भावे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली. मग अटकेच्या सात तासानंतर जितेंद्र भावे आणि रुग्णाच्या नातेवाईकाची मुंबई नाका पोलीस ठाण्यातून सुटका झाली होती.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा