Bogus Certificate : बोगस सर्टिफिकेट रॅकेट प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, दोघेही अद्याप फरार
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक के. श्रीनिवास आणि निखिल सैंदाणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.
नाशिक: नाशिकमधील बहुचर्चित जिल्हा शासकीय रुग्णालयातील बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र रॅकेट प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक के. श्रीनिवास आणि निखिल सैंदाणे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. सध्या हे दोघेही फरार आहेत. या दोघांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नाशिकमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातील बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र रॅकेट प्रकरणी आतापर्यंत नाशिक तालुका पोलिस ठाण्यात 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक आणि धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, कर्मचारी, खाजगी डॉक्टर्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या जिल्हा अंतर्गत बदलीकरिता अशा प्रकारचे बोगस प्रमाणपत्र रुग्णालयाच्या वतीनं देण्यात येत होते.
काय आहे प्रकरण?
पोलिस खात्यातील आंतर जिल्हा बदलीसाठी राज्यभरातील 22 पोलिस अंमलदारांनी 18 मे 2022 पूर्वी हे अर्ज सादर केले होते. त्या अर्जासोबत त्यांनी नातेवाईकांना गंभीर आजार असल्याचे नाशिक आणि धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. या अर्जासह कागदपत्रांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज यांनी व्यवस्थित तपासणी न करता बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यास मदत केली. त्यासाठी नाशिक आणि धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा अर्जदार पोलिस अंमलदाराचे नातेवाईकांचे गंभीर आजाराचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यास मदत केली. त्यातून वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व लिपिकाने अर्जदार पोलिस अंमलदारांना आंतरजिल्हा बदलीसाठी मदत केली. याप्रकरणी अतिरिक्त उपविभागीय पोलिस अधिकारी खंगेंद्र टेंभेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या रॅकेटची उकल झाली.
शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी असलेल्या अटींपैकी एक शस्त्रक्रियेची अट आहे. त्यानुसार काही अर्जदारांनी बनावट अहवाल सादर केले. ही बाब लक्षात आल्यांनंतर रुग्णालय प्रशासनातर्फे तपासणी केल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. त्यातील घोळ उघड झाला असून संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. आतरंजिल्हा बदलीसाठी आणखी कोणी बोगस प्रमाणपत्र दिले आहेत का? याचा शोध घेतला जात असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
यांचा रॅकेटमध्ये समावेश
दरम्यान बोगस प्रमानपत्रांच्या रॅकेटमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या रॅकेटमध्ये नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा रवींद्र कनोज नाशिक, धुळे जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयातील लिफ्टमॅनसह कनिष्ठ लिपिक किशोर पगारे, त्याचबरोबर शहरातील दोन हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांचा समावेश असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.