(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मै अपना बंगाल नही दुंगी, अशी प्रतिज्ञा घेत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या : भुजबळ
मै अपना बंगाल नही दुंगी अशी प्रतिज्ञा घेत, ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या म्हणून त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया मंत्र छगन भुजबळ यांनी दिली आहे.
नाशिक : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांची सत्ता येताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या.. मै अपना बंगाल नही दुंगी अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या. 8 ते 10 मंत्री ठाण मांडून बसले होते. पण, उपयोग झाला नसल्याची टीका भुजबळ यांनी केलीय.
संपूर्ण शक्ती लावूनही आसाम वगळता भाजपला कुठेच साथ नाही. भाजप विरोधात प्रचंड लाट देशात तयार झाली आहे. या काळात देशात निवडणूक झाली तर भाजप नावालाही सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय. तर पंढरपूर पोट निवडणुकीचा निकाल गट तट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे, त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने 200 जागांचा टप्पा पार केला आहे. तृणमूल काँग्रेस 208 जागांवर पुढे असून भाजपची आघाडी 80 जागांवर आली आहे. यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्वीट करत पश्चिम बंगाल निवडणुकीतील विजयबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.
शरद पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "पश्चिम बंगाल निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन. आता जनतेच्या हितासाठी आणि कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र काम करुया".
पुन्हा ममता मुख्यमंत्री होणार?
पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत तृणमूल काँग्रेसला मोठं मताधिक्य मिळालं आहे. भाजपला 37.3 टक्के मतं तर तृणमूल काँग्रेसला 48.4 टक्के मतं मिळाली आहेत. पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये तृणमूल काँग्रेस 200 च्या पार गेली आहे. 206 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर असून भाजप 83 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेसला 1 जागेवर आघाडी मिळाली आहे.
मतमोजणीच्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेसाठी 822 आरओ आणि 7000 एआरओंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, 2364 केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या सुरु असणाऱ्या कोरोना संसर्गाची लाट पाहता कोणीही व्यक्ती, एजंट यांना मतमोजणी केंद्रावर आरटीपीसीआर चाचणी किंवा कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याच्या निश्चिततेशिवाय आत घेतलं जाणार नाही.