(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये बिबट्याचा धुडगूस सुरूच, हल्ल्यात मजूर युवकाचा मृत्यू
Maharashtra Nashik News : नाशिकमध्ये बिबट्याचा धुडगूस सुरूच. काल बिबट्याच्या हल्ल्यात मजूर युवकाचा मृत्यू झाला असून मागील काही दिवसांतील गिरणारे पंचक्रोशीतील बिबट्याचा हा तिसरा हल्ला आहे.
Maharashtra Nashik News : नाशिक (Nashik) तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. आज दुपारच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मजूर युवकाचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहराजवळील गिरणारे परिसरात ही घटना घडली. अरुण हिरामण गवळी असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे. सदर युवक हा मूळचा हरसूल येथील असून तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. मात्र आज गिरणारे येथील दिलीप काशिनाथ थेटे यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.
बिबट्याच्या हल्ल्यात संबधित युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक आहे. याप्रकरणी वन विभाग आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागानं घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला.
मागील काही दिवसांतील गिरणारे पंचक्रोशीतील बिबट्याचा हा तिसरा हल्ला आहे. याआधी गिरणारे जवळील धोंडेगाव येथील एका लहान मुलीचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर साडगाव रस्त्यावर एका मजुरावर बिबट्यानं हल्ला चढविला होता. सुदैवानं या हल्ल्यात तो मजूर बचावला. दरम्यान, गंगापूर-गोवर्धन शिवारातसुद्धा रात्री साडेदहा वाजता काही दुचाकीचालकांना बिबट्या रस्ता ओलांडताना नजरेस पडल्याचे काही नागरिकांनी बघितले आहे.
वनविभागाचे आवाहन
सदर परिसरांत द्राक्ष बागा, ऊस शेती आणि इतर बागायती शेती असल्याने बिबट्यांचा वावर आहे. अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करू लागल्यानं अनेकदा हल्ल्याच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांनी पहाटे आणि संध्याकाळनंतर घराबाहेर भटकंती करू नये, अथवा उघड्यावर शौचासाठी जाऊ नये, असं आवाहन वन खात्यानं केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :