(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : चालकाची हत्या करून सिमेंट भरलेला ट्रक पळवला, वर्ध्यातील घटनेने खळबळ
Wardha News Update : वर्ध्यामधील समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाची हत्या करून ट्रक पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.
Wardha News Update : ट्रक चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह झूडपात फेकून सिमेंट भरलेला ट्रक पळवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वर्ध्यामधील समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदोरी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या करणाऱ्या आरोपींना शोधण्यासाठी गुन्हे शाखा आणि समुद्रपूर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 21 मे रोजी दुपारी नांदोरी परिसरातील झुडपात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना संशय आल्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याच दिवशी नागपूर येथील रहिवासी अमरसिंग राजू पांडे हे समुद्रपूर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी आपला मोठा भाऊ दयालसिंग राजू पांडे (वय 30) हा काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना नांदोरी परिसरात आढळलेला मृतदेह दाखवल्यानंतर तो दयालसिंग पांडे याचा असल्याचे स्पष्ट झाले.
हत्या करून 13 लाख 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पळवला
दयालसिंग पांडे हे 18 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील अवरपूर येथून ट्रक घेऊन निघाले होते. या ट्रकमध्ये सिमेंटच्या पिशव्या भरलेल्या होत्या. 21 मे पर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे अमरसिंग पांडे त्याच्या शोधात होते. 21 मे रोजी दुपारी दयालसिंग याचा संशयास्पद मृतदेह नांदोरी परिसरातील झुडपात आढळला. त्याच्या शरीरावर जखमांचे निशानही दिसून आले. कोणीतरी त्याची हत्या करून मृतदेह फेकून दिला आणि सिमेंटने भरलेला ट्रक आणि काही कागदपत्रे असा 13 लाख 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन हत्यारे पसार झाले, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
याप्रकरणी अमरसिंग पांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात हत्येसह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेची दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. हत्याकांडातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हातात लागल्याची माहिती आहे. लवकरच घटनेतील आरोपींना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.