NMC Recruitment: नाशिक महापालिकेतील नोकरभरतीला राज्य शासनाचा हिरवा कंदील
Nashik Municipal Corporation: नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला असून यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने लवकरच या भरतीला सुरवात होईल,
Nashik Municipal Corporation: नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला असून यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने लवकरच या भरतीला सुरवात होईल, असे संकेतही या माध्यमातून मिळाले आहेत.नाशिक महापालिकेत मागील सुमारे 24 वर्षांपासून नोकरभरतीची प्रक्रिया झालेली नाही. यासाठी वेळोवेळी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत होता. मात्र आस्थापना खर्च जास्त असल्यामुळे हिरवा कंदील मिळण्यास अडचणी येत होत्या. मात्र, नाशिक महापालिकेत मागील चार महिन्यापासून प्रशासक राजवट सुरू असल्यामुळे आस्थापना खर्च कमी झाला आहे. यामुळे आता नाशिक महापालिकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला असून भरतीच्या सेवा शर्तीला नगरविकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
नाशिक महापालिकेतील नोकर भरतीसाठी महापौरांचा मोलाचा वाटा
नाशिक महापालिकेत नोकर भरती व्हावी, यासाठी विशेष महासभा घेऊन तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे रवाना केला होता. मात्र यावर काही निर्णय झालेला नव्हता. परंतु आता अनेक अडथळ्यांवर मात करीत नोकर भरतीची फाईल पुढे सरकली आहे.
नाशिक महापालिकेवर प्रशासकीय राजवट
दरम्यान नाशिक महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने काही दिवसांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या नोकर भरतीसाठी आस्थापना खर्च 35 टक्केहून 33.2 टक्के इतका कमी झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खतगावकर यांच्या पुढाकारानंतर फाईलचा प्रवास गतीमान झाला.
महापालिकेच्या खर्चात बरीचशी कपात
प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेच्या खर्चात बरीचशी कपात झाली आहे. यामध्ये सदस्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कार्यालयातील विद्युत बिल, गाड्यांच्या इंधन आदींवर निर्बंध आले आहेत. तसेच नवीन आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी काटकसरीचे धोरण अवलंबिले आहे. तसेच वसुलीकडे विशेष लक्ष दिल्याने पाणीपट्टी, घरपट्टी वसुली वाढीचे प्रयत्न चालविले आहे.
इतक्या पदांना मंजुरी
नाशिक महापालिकेत 7 हजार 717 पद मंजूर असून त्यातील प्रत्यक्षात 4 हजार 679 कर्मचारी कार्यरत आहेत. तर 3 हजार 38 पद रिक्त आहेत. अ 159, ब 49, क 1हजार 472 तर, ड वर्गवारीत 1 हजार 205 इतकी पद रिक्त आहेत. त्यात डॉक्टर, इंजिनियर, लिपीक, अशा अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत.
मनपा आयुक्त म्हणाले...!
नाशिक महापालिकेत गरजेनुसार नोकर भरतीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामध्ये प्राधान्यक्रमाने डॉक्टर्स, इंजिनियर तसेच फायरमन यांची भरती होणार आहे. मात्र ही भरती प्रक्रिया महापालिका प्रशासन करणार नसून देशातील नामांकित अशा कंपनीच्या माध्यमातून महापालिका नोकरभरती करणार आहे. त्यांची परीक्षा आदींची प्रक्रिया खाजगी कंपनी द्वारे होऊन आपल्या मागणीप्रमाणे मनुष्यबळ आपल्याला मिळणार आहे.
हे देखील वाचा-