Malegaon Lal Masjid : मालेगांवच्या लाल मशिदीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
मशिदीची रचना, वैशिष्ट्ये या गुणांच्या आधारे सौदी अरेबियातील संस्थने जगभरातील 200 मशिदीमधून अंतिम 22 मशिदीची निवड केली आहे. या भारतातून एकमेव लाल मशिदीची निवड झाली आहे.

मालेगाव : मशिदीवरील भोंगेचा वाद सुरु असतानाच मालेगांवच्या लाल मशिदीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मशिदीची रचना, वैशिष्ट्ये या गुणांच्या आधारे सौदी अरेबियातील संस्थने जगभरातील 200 मशिदीमधून अंतिम 22 मशिदीची निवड केली आहे. या भारतातून एकमेव लाल मशिदीची निवड झाली आहे.
मालेगांवच्या पवारवाडीत 2011 ते 2016 या काळात ही लाल मशिद उभारण्यात आली आहे. मशिदीचे नाव हाजी अब्दुल रुउफ मशीद, लाल विटांच्या बांधकामामुळे लाल मशिद म्हणून ओळखली जाते. साधारणपणे 900 स्क्वेवर मीटर परिसरात मशिद उभारण्यात आली आहे. जमिनीपासून 85 फूट उंच असून एकच मिनार आहे. संपूर्ण आरसीसी बांधकाम करण्यात आलं. यानंतर चार इंच जागा मोकळी सोडून लाल विटांचे बांधकाम करण्यात आलं. यामुळे बाहेरील हवामानाचा आत परिणाम जाणवत नाही. बाहेर उन्हाचा तडाखा जाणवत असला तरी आतमध्ये गारवा असतो, किंवा बाहेर कडाक्याची थंडी असली तर आतमध्ये उब जाणवते. हवा खेळती राहावी, सूर्यप्रकाश सूर्यास्त पर्यंत प्रत्येक कोपऱ्यापर्यंत जावा यासाठी विशेष योजना करण्यात आली आहे. फरश्यांची रंगसंगती, पायऱ्यासाठी वापरण्यात आलेले लाल दगड मजबूत आणि जुन्या काळातील बांधकामाची आठवण करुन देतात.
सौदी अरेबियामधील अल फौजान फाऊंडेशनच्यावतीने दर तीन वर्षांनी जगभरातील मशिदीचा सर्व्हे केला जातो. त्यातून आकर्षक रचना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बांधकामाचा दर्जा, लोकाभिमुख कार्य आशा वेगवेगळ्या निकषांचा अभ्यास करुन सर्वोत्कृष्ट मशिदीची निवड केली जाणार आहे. जगभरातील 200 मशिदीमधून जॉर्डन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान अशा 17 देशातील 22 मशिदीची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. यात देशभरातून मालेगांवच्या लाल मशिदचा समावेश करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये कुवेतमध्ये सर्वोत्कृष्ट मशिदीच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मालेगांवचं वातावरण तणावपूर्ण बनत चाललं आहे. काही झालं तरी मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही अशी आक्रमक भूमिका मौलवींनी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या डीजे गाडीवर दगडफेक झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अशा सर्व नकारात्मक घडामोडींमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लाल मशीद पात्र ठरल्याने एवढीच काय ती सकारात्मक घटना घडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
