आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत नोकरीच्या प्रतिक्षेत; न्यायासाठी राज्यपांलाकडे धाव
सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत गेले अनेक दिवस शासकीय सेवेत नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे. परंतु, न्याय न मिळाल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून तिने राज्यपालांकडे धाव घेतली आहे.
नाशिक : सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनं न्याय मिळावा म्हणून राज्यपालांकडे धाव घेतली आहे. नोकरीसंदर्भात होत असलेल्या अन्यायाची कैफियत कविता राऊतनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींपुढे मांडली आहे. 2014 पासून वर्ग एकच्या पदासाठी शासकीय सेवेत नोकरी मिळावी, म्हणून कविता राऊतनं अर्ज केला होता. मात्र कवितानंतर अर्ज केलेल्या काही खेळाडूंची वर्ग एकच्या पदासाठी शासकीय सेवेत नियुक्ती झाली असून कविता अजूनही नोकरीच्या प्रतिक्षेतच आहे.
शासकीय नोकरी मिळण्यासाठी विलंब होत असल्यामुळे कविता राऊतनं एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी कविता म्हणाली की, '2014 पासून वर्ग एकच्या पदासाठी अर्ज केलेल्याची फाईल अद्याप प्रोसेसमध्येच आहे. मी वेळोवेळी फॉलोअप घेऊनही अद्याप मला न्याय मिळालेला नाही.' पुढे बोलताना तिने सांगितलं की, 'सध्या ओएनजीसीमध्ये देहरादूनला माझी पोस्टिंग करण्यात आलेली आहे. मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाली आहे आणि ग्रामीण भागांतील खेळाडूंच्या समस्या माझ्यापेक्षा जास्त कोणाला समजू शकत नाहीत. मला महाराष्ट्रासाठी माझ्या ग्रामीण भागांतील खेळाडूंसाठी मला काम करायचं आहे. हाच विचार समोर ठेवून मी अर्ज केला होता. पण अद्यापही मला न्याय मिळालेला नाही.'
पाहा व्हिडीओ : देशाला पदकं मिळवून देणारी कविता राऊत नोकरीच्या प्रतिक्षेत, राज्यपालांकडे घेतली धाव
कविता राऊतनं पुढे बोलताना सांगितलं की, 'माझ्यानंतर अर्ज केलेल्या खेळाडूंना पोस्टिंग मिळाल्या आहेत. परंतु, मला अजूनही न्याय मिळालेला नाही. यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि अद्याप माझे प्रयत्न सुरु आहे. यामध्ये मला अनेक मंत्र्यांनीही मदत केली. पण तरी काम न झाल्यामुळे माझं कुठं चुकतंय किंवा मी खेळात कुठे कमी पडलेय का? हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आहे.' तसेच कविताने बोलताना 'राज्यपालांना भेटणं हा माझा शेवटचा पर्याय होता. शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाकडून माझ्या कामात अडचणी येत आहेत. माझी फाईल तिथून पुढे जात नाही आहे.' असंही सांगितलं. '2018 मध्ये ज्या 33 खेळाडूंची यादी निघाली होती, त्यातही माझं नाव नव्हतं.', असंही कविता राऊतनं सांगितलं आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनं राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. शिवाय इतर बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही कविता राऊतनं भारताला पदकं मिळवून दिली आहेत. 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून तिनं सहभाग घेतला होता. तसेच कविताला खेळाडूंसाठी देण्यात येणार अर्जुन पुरस्कारही देण्यात आला आहे.