(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमधील शेतकऱ्याचे 4 एकर कोथिंबीरीतून 12 लाखांचे विक्रमी उत्पन्न
एकरी 40 हजार खर्च करून तयार झालेल्या पिकाला काढणी आधीच भाव मिळाला आणि तो ही लाखांच्या घरात. 4 एकर क्षेत्रात लावलेल्या कोथिंबीरीला सिन्नर तालुक्यातील व्यापाऱ्याने विकत घेतले.
शिर्डी : एकीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत असताना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने 4 एकर क्षेत्रात कोथिंबीर पिकातून 12 लाख 51 हजार रुपयांची विक्रमी उत्पन्न मिळविल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावातील शेतकरी विनायक हेमाडे यांना हे विक्रमी उत्त्पन्न मिळालं आहे.
विनायक हेमाडे गेल्या अनेक वर्षांपासून कांदा, ज्वारी, बाजरी गहू सारखी पिके शेतात घेत असत. यातून उत्पन्न ही जेमतेम मिळत असे. मात्र यावर्षी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील बियाणे कंपनीच्या नवीन आलेल्या कोथिंबीर वाणाची निवड केली व 4 एकर क्षेत्रात कोथिंबीर पिकवलीय. एकरी 40 हजार खर्च करून तयार झालेल्या पिकाला काढणी आधीच भाव मिळाला आणि तो ही लाखांच्या घरात. 4 एकर क्षेत्रात लावलेल्या कोथिंबीरीला सिन्नर तालुक्यातील व्यापाऱ्याने विकत घेतले असून 12 लाख 51 हजार रुपयांना हा सौदा ठरल्याचा आनंद विनायक हेमाडे यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं.
विनायक यांची पत्नी शहरी भागातील असून पूर्वी शेतीचं कोणतंही ज्ञान नसताना त्यांनी हवी तशी मदत केली. अवघ्या कुटुंबाने केलेल्या मदतीमुळे यावर्षी चांगलं पीक आल्याचं सांगत मुलींनी शिक्षणाबरोबरच शेती सुद्धा केली पाहिजे असं आवाहन केलं.
आपल्या कंपनीच्या वाणाला विक्रमी भाव मिळाल्यानं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तात्काळ शेतकऱ्याची थेट बांधावर जात भेट घेतली असून त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. एकीकडे बळीराजाच्या मालाला भाव मिळत नाही असं बोललं जातं मात्र योग्य व्यवस्थापन व योग्य पिकाची योग्य वेळी निवड केल्यास भावही उच्चांकी मिळू शकतो हे हेमाडे यांनी दाखवून दिलं आहे.