नाशिकमध्ये चोरीच्या उद्देशाने राष्ट्रीय खेळाडूवर प्राणघातक हल्ला
पुणे येथील नाशिक फाट्याजवळ असलेल्या आर्मी बोटिंग क्लब येथे 17 ते 19 दरम्यान राज्यस्तरी रोईंग स्पर्धा आहे. या स्पर्धेची निखिल तयारी करत होता. मात्र या हल्ल्यामुळे निखिलला या स्पर्धेला मुकावं लागणार आहे.
नाशिक : राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी लूटमार करण्यासाठी प्राणघातक हल्ला आहे. या हल्ल्यात निखिल जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व घटनेमुळे निखिलला दोन दिवसांनी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावं लागणार आहे.
निखिल मंगळवारी रात्री सराव करुन येत असताना चोपडा लॉन्स येथील पेट्रोल पंपासमोर त्याला चोरट्यांनी रोखलं. निखिलला लुटण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी निखिलला अडवलं, मात्र त्याच्याकडे काहीच न मिळाल्याने त्यांची निराशा झाली. निखिलकडे काहीच न मिळाल्याच्या रागातून चोरट्यांनी निखिलवर कोयता आणि चाकून हल्ला करुन पसार झाले.
पुणे येथील नाशिक फाट्याजवळ असलेल्या आर्मी बोटिंग क्लब येथे 17 ते 19 दरम्यान राज्यस्तरी रोईंग स्पर्धा आहे. या स्पर्धेची निखिल तयारी करत होता. मात्र या हल्ल्यामुळे निखिलला या स्पर्धेला मुकावं लागणार असल्याने त्याचं एका वर्षाचं नुकसान होणार आहे. निखिलने याआधी या स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक पटकावलेलं आहे. याशिवाय निखिलच्या सरावातही खंड पडणार आहे. निखिलची घरची परिस्थिती हलाखीची असून त्याने खूप कष्ट केले आहेत हे सांगतांना त्याच्या आईला रडू कोसळलं.
नाशिक शहरात दिवसेंदिवस चोऱ्या, प्राणघातक हल्ल्याचे प्रकार वाढत असताना आता खेळाडूही असुरक्षित नसल्याचं या घटनेतून समोर आलं आहे. क्रीडाक्षेत्रातून या हल्ल्याचा निषेध होत आहे.