(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी'; वंचित पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
Swabhimani Shetkari Sanghatna : वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. आता मनोज जरांगे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Nashik News नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठींबा जाहीर केला आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये न जाता अपक्ष निवडणूक लढविण्याची मागणी स्वभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatna) मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. त्यासाठी जरांगे यांनी सभागृहात जावे. ऊसाला हमीभाव मिळावा यासाठी राजू शेट्टी संसदेत गेलेत, तसेच जरांगे पाटील यांनीही सभागृहात जाण्याची मागणी करण्यात आली आहे. आता मनोज जरांगे पाटील हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मनोज जरांगेंना सलाम
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मराठी माणसाला एकत्र करून मराठा आरक्षणाचा जो अलौकिक लढा मनोज जरांगे पाटलांनी उभा केला त्याला खऱ्या अर्थाने सलाम केला पाहिजे. त्यांच्या आंदोलनाने यश पदरात पडलेच. परंतु ते यश टिकवू नसल्याचे अनेकांचे म्हणणे नाही. मनोज जरांगे पाटील यांचेही असे मत आहे की, हे कायद्याच्या चौकटीत टिकणारे नाही. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही.
मनोज जरांगेंसारखा योद्धा संसदेत हवा
आरक्षणाची 52 टक्के अट आहे. ती अट रद्द झाल्याशिवाय मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळवायचा असेल तर संसदेत नवीन कायदा पारित होणे गरजेचे आहे. 52 टक्क्यांची अट शिथिल होऊन त्यात वाढ होणे आवश्यक आहे. हा अधिकार केवळ संसदेला आहे. ते हे बिल मंजूर करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा योद्धा तिथे असायला हवा.
लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवावी
जसे राजू शेट्टी यांनी आयुष्यभर रस्त्यावरती शेतकऱ्यांसाठी लढा लढला. पण त्याच्यासोबत ते संसदेत गेले आणि ऊसाला हमीभाव मिळण्यासाठी काय करून घेतला. जे चुकीचे भूमी अधिग्रहण बिल होते ते उधळून लावले. राजू शेट्टी संसदेत होते म्हणून हे शक्य झाले. तसेच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हवे असल्यास मनोज जरांगे पाटील यांनी संसदेत जायला हवे. लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवायला हवी.
...तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जरांगेंना पाठींबा
जालना मतदार संघातून ते निवडणुकीसाठी उभे राहणार असतील तर त्यांनी स्वतंत्र उभे राहावे, अशी आमची मागणी आहे. त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीसोबत लढू नये. मनोज जरांगे पाटील हे जर निवडणूक लढवणार असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्यांना पाठींबा असेल, असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे.