Sudhakar Badgujar : लोकसभेला आम्ही जिल्हाप्रमुख बदलला, प्रस्तावात सर्वांचीच सही, पण...; ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यात बडगुजरांनी बोलून दाखवली खदखद
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांनी निर्धार शिबिराच्या व्यासपीठावरच खदखद व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Sudhakar Badgujar : लोकसभेला (Lok Sabha Election) आम्ही जिल्हाप्रमुख बदलला, त्या प्रस्तावात सर्वांनी सही केली. टार्गेट मला केले. पण कोणी केले तर बडगुजर यांनी केले, असे सांगितले गेले, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आपली खदखद व्यक्त केली. नाशिकमध्ये (Nashik News) आज ठाकरेंच्या शिवसेनेचे एकदिवसीय शिबीर पार पडत आहे. या शिबिरात 'आम्ही शिवसेनेसोबत का?' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यात शिवाजीराव ढवळे, सुधाकर बडगुजर, वसंत गीते,शिवसेना उपनेते अद्वय हिरे सहभागी झाले होते.
सुधाकर बडगुजर म्हणाले की, शिवसेनेत काम करताना संघर्ष केला. हल्ले विरोधकांचे कमी आपल्याच लोकांचे जास्त होते. हमे तो अपनो ने लुटा... नवीन लोक आलेत आणि आपल्याला शहाणपणा शिकवतात. लोकसभेला आम्ही जिल्हाप्रमुख बदलला, त्या प्रस्तावात सर्वांनी सही केली. टार्गेट मला केले. पण कोणी केले तर बडगुजर यांनी केले, असे सांगितले गेले, अशा शब्दात सुधाकर बडगुजर आपली खदखदत व्यक्त केली. यानंतर शिवसैनिकांमध्ये बसलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बडगुजर विषयावर बोला, अशी सूचना केली. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी ज्यावेळेस माझ्याकडे महानगर प्रमुखांची जबाबदारी आली, त्यावेळेस कोविड काळ होता. कोणीही बाहेर निघत नव्हते. प्रशासन हतबल होते, त्यावेळी राधाकृष्ण गमे नावाचे कमिशनर होते. त्यांनी सांगितलं समाजासाठी मला काही करायचं असेल तर रस्त्यावर उतरा. नाहीतर ही कोरोनाची लाट आटोक्यात येणार नाही. मी त्यावेळी शिवसेनेचा महानगरप्रमुख म्हणून रस्त्यावर उतरलो. गल्लोगल्ली फिरलो. शिवसेनेने कोविड सेंटर सुरु केले होते, अशी आठवण करून दिली.
बडगुजरांनी खदखद व्यक्त केल्याने चर्चांना उधाण
यानंतर सुधाकर बडगुजर यांचे उत्तर संपताच शिवसैनिकांमध्ये बसलेल्या संजय राऊत यांनी वसंत गीते यांना पुढचा प्रश्न विचारला. मात्र, सुधाकर बडगुजर यांनी निर्धार शिबिराच्या व्यासपीठावरच खदखद व्यक्त केल्याने याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
तरुणांनी पुढे यायला पाहिजे : वसंत गीते
दरम्यान, तुम्ही आता शिवसेनेत पूर्णपणे रुळलेला आहात. तुमच्यासमोर नवीन पिढी दिसत आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल? असा सवाल संजय राऊत यांनी वसंत गीते यांना विचारला. यावेळी वसंत गीते म्हणाले की, आता या तरुण पिढीकडे नेतृत्व दिले पाहिजे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. संकट येत असतात आणि संकट परतवून लावण्याची ताकद शिवसेनेत आहे. त्यासाठी तरुणांनी पुढे यायला पाहिजे. पंचवीस वर्षे आपण ज्या लोकांसोबत काम केलं त्यांनी आपली साथ सोडली. आपण आपले कुटुंब वाढवले पाहिजे, आपला पक्ष वाढवला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा


















