Sanjay Raut : केंद्रीय गृहमंत्र्यांची आढावा बैठक हा फार्स, कलेक्टर अन् अधिकाऱ्यांना दम देणार, हा 10 वर्षांचा अनुभव : संजय राऊत
Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभेला हिशोब पूर्ण केला, असं राऊत म्हणाले.
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यावर टीका केली. अमित शाह यांच्य आढावा बैठका, महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभा निवडणुकीत दिलेला कौल, नरेंद्र मोदींचे महाराष्ट्र दौरे, एकनाथ शिंदे यांचं सरकार या बाबींवरुन संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. अमित शाह उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मणिपूरला गेले नाहीत आढावा घ्यायला, काश्मीरच्या सीमेवर गेले नाहीत आढावा घ्यायला, लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलंय त्याचा आढावा नाही. अरुणाचल प्रदेशात चीनचं सैन्य 60 किमी आत घुसलंय त्याचा आढावा नाही. पण, उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री गृहखात्याचं विशेष विमान घेऊन येतात ही गोष्ट गमतीची वाटते. याचा अर्थ महाराष्ट्रात भाजपची खटीया खडी होतेय, त्यामुळं केंद्रीय गृहमंत्र्यांना यावं लागतंय, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढं म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार, आढावा बैठक हा फार्स आहे, कलेक्टर अन् अधिकाऱ्यांना दम देणार, निवडणुकीत आमच्या बाजूनं राहा मतमोजणी करताना या गोष्टीच्या पलीकडं आढावा नसतो. जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी येतात हा गेल्या 10 वर्षातील अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत दबावाचं राष्ट्रीय कार्य काही मतदारसंघात केलं त्यामुळं ते सत्तेवर आले. मला चिंता इतकीच वाटते की जेव्हा जेव्हा मोदी अमित शाह इथं येतात तेव्हा राज्यातील उद्योग बाहेर जातात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
भाजपला महाराष्ट्राच्या जनतेनं धडा शिकवला
संजय राऊत पुढं म्हणाले, धोका कुणी कुणाला दिला हे महाराष्ट्र जाणतो म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपचा हिशोब चुकता केला. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून अमित शाह यांनी महाराष्ट्राला आणि शिवसेनेला धोका दिला. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र खोलीत शब्द दिले घेतले, चर्चा झाली, त्यासंदर्भातील धोकेबाजी कुणी केली असेल तर अमित शाह यांनी केली हे सर्व जनतेला माहिती आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभा निवडणुकीत हिशोब चुकता केला. त्यामुळं या राज्याची जनता कुणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको, असं त्यांनी म्हटलं.
अमित शाह यांचा मुलगा आला तरी मुख्यमंत्री स्वागताला येतील. लाचार, लोचट, स्वाभिमान शून्य सरकार इथं बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागताला हजर राहणारचं, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. अमित शाह भाजपच्या आढावा बैठकीसाठी येत आहेत. सेनेच्या लोकांनी मुख्यमंत्री स्वागताला येणार असा बॅनर लावल्याचं सांगितलं. या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीची किती चाटूगिरी करतात. मुख्यमंत्र्यांना काम काय, त्यांचे गॉडफादर येत आहेत, असं राऊत म्हणाले.
भाजपचा इतिहास वापरा आणि फेका असा आहे. सर्वप्रथम अजित पवारांचा काटा काढला जाईल. 2024 नंतर आताच्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा काटा काढला जाईल, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्राची निवडणूक, हरियाणाची निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे. महाराष्ट्र ज्या दिवशी हारतील त्या दिवशी मोदींची पंतप्रधानपदाच्या खूर्चीवरुन उतरण्याची क्रिया प्रक्रिया सुरु झालेली असेल. विनोबा भावे यांची सब भूमी गोपाल की अशी घोषणा होती. आता भाजपच्या राज्यात सर्व भूमी देवा भाऊ की अन् ती त्यांना वाटेल त्यांना दिली जातेय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
इतर बातम्या :