Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीत मध्यरात्री हालचालींना वेग, राजेश टोपे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Rajesh Tope meets Manoj Jaragne: राजेश टोपे यांनी मंगळवारी मध्यरात्री अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इरेला पेटलेले मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्री शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) हे अचानक अंतरवाली सराटी येथे आले होते. ते काहीवेळ स्टेजवर मनोज जरांगे यांच्यापाशी जाऊन बसले होते. या दोघांमध्ये काही चर्चा झाली किंवा नाही, याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, राजेश टोपे हे काहीवेळ मनोज जरांगे (Manoj Jaragne Patil) यांच्या उशापाशी बसून होते. त्यानंतर राजेश टोपे यांनी जरांगेंच्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली.
मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी केली होती. त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. राजेश टोपे गेल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती फारच खालावत असल्याने आंदोलकांनी सहकाऱ्यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मध्यरात्री वैद्यकीय उपचार घेतल्याचे समजते.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मनोज जरांगे यांचा रक्तदाब सातत्याने वरखाली होत आहे. अशक्तपणामुळे त्यांना चालणे आणि एका जागेवर बसणेही मुश्कील झाले आहे. शरीरातील पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने मनोज जरांगे यांना चक्करही येत आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील हे वैद्यकीय उपचार घ्यायला तयार नाहीत. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती वेगाने खालावत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.
जिल्हाधिकाऱ्यांकडून जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती
मनोज जरांगे यांनी मंगळवारी मध्यरात्री गावकरी आणि सहकाऱ्यांच्या आग्रहाने वैद्यकी उपचार घेतले. रात्री एकच्या सुमारास त्यांना सलाईन लावण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे यांना त्यांना उपचाराला सहकार्य करत उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली.
मनोज जरांगे यांच्या जीवाला इजा झाली तर राज्य सरकार जबाबदार असेल: पृथ्वीराज चव्हाण
राज्य सरकारने तातडीने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करुन उपोषणाबाबत तोडगा काढावा. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती येत आहे. मनोज जरांगे यांचा जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनोज जरांगे यांना काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
मनोज जरांगे यांचे उपोषण आणखी काही काळ सुरु राहिल्यास मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास साधारण 20 दिवस बाकी असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने पुढील काही दिवस हे मराठा आरक्षण आंदोलनाच्यादृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.
आणखी वाचा