(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा 'वंचित'ने हेरलाच! नाशिकमधून करण गायकरांना उमेदवारी जाहीर, जळगावात उमेदवार बदलला
Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली. यात नाशिक आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
Vanchit Bahujan Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) आज उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Lok Sabha Constituency) आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा (Jalgaon Lok Sabha Constituency) समावेश आहे. वंचितकडून नाशिकसाठी मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा करण गायकर (Karan Gaikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिंडोरी पाठोपाठ जळगावातून उमेदवार बदलण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे.
राज्यातील बहुतेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार देण्यात येत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातदेखील वंचितकडून उमेदवार दिला जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. नाशिकचा मतदारसंघाची ओळख ही मराठा बहुल मतदारसंघ अशी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राजकारण तापलेले असतानाच नाशिकमध्ये मराठा समाजाकडून उमेदवार दिला जाईल, अशी शक्यता होती. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
अखेर करण गायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब
नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठा समाजाचे नेते करण गायकर इच्छुक होते. मराठा आंदोलनातील पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली होती. यात वंचितकडून मराठा उमेदवार म्हणून करण गायकर यांना उमेदवारी देण्यावर चर्चा झाली होती. आज अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांच्या नवव्या यादीत करण गायकरांच्या नावाची घोषणा केली आहे.
नाशिकच्या निवडणुकीत वंचित तगडे आव्हान देणार?
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला होता. त्यांना एकूण 5, 63, 599 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना 2,71, 395 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना 1, 34, 527 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार (Pawan Pawar) यांना 1, 09, 981 मते मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही वंचित एक महत्वाचा पक्ष ठरू शकतो. आता वंचितकडून मराठा समाजाच्या नेत्याला उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने करण गायकर हे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना आव्हान निर्माण करू शकतात.
दिंडोरीपाठोपाठ जळगावात वंचितला उमेदवार बदलण्याची वेळ
तर आज जळगाव लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारही वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वंचितकडून या जागेवर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी माघार घेतल्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी युवराज जाधव (Yuvraj Jadhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कालचा वंचितकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार बदलण्यात आला होता. दिंडोरी लोकसभेसाठी गुलाब बर्डे (Gulab Barde) यांना सुरुवातीला उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र माघार घेतल्याने त्यांच्या जागी मालती थविल (Malati Thavil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलीचा खेळखंडोबा सुरूच असल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा
Dindori Loksabha : वंचितचा उमेदवार बदलाबदलीचा खेळखंडोबा सुरुच; आता दिंडोरीत उमेदवार बदलला