Deepika Padukone : मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबद्दल महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

Deepika Padukone Pariksha Pe Charcha : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'परीक्षा पे चर्चा 2025' सत्रात सहभाग घेतला होता. यावेळी तिने नैराश्याशी संबंधित तिचे वैयक्तिक अनुभव शेअर केले आहेत. मानसिक आरोग्यासाठी जनजागृती आणि संवादाची गरज असल्याचे दीपिकाने म्हटले. भावना व्यक्त करणे आणि योग्य वेळी मदत घेणे खूप महत्त्वाचे आहे, असा अनुभव तिने सांगितला आहे. सतत कष्ट करत असताना एक दिवस ती बेशुद्ध पडली. यानंतर ती डिप्रेशनमधून जात असल्याचे तिच्या लक्षात आले. यामुळे दीपिकाने विद्यार्थांना स्वतःची ताकद समजून घेऊन ती लिहून ठेवण्याचा सल्ला दिलाय.
दीपिका पदुकोणने तिच्या शाळेतील दिवसांच्या आठवणीवर भाष्य केले आहे. दीपिकाने म्हटले आहे की, शाळेत असताना मी अभ्यास, खेळ आणि मॉडेलिंग अशा अनेक कामांमध्ये सहभागी होते. 2014 साली एक दिवशी, मी काम करत असताना मी अचानक बेशुद्ध पडली आणि काही दिवसांनी मला जाणवले की मी नैराश्याने ग्रस्त आहे. नैराश्य आले तरी ते ओळखता येत नाही. मी याबद्दल कोणालाही सांगितले नाही.
मी मुंबईत एकटीच राहत होते. त्यावेळी पण हे कोणालाही सांगितले नव्हते. जेव्हा माझी आई मुंबईत आली आणि काही दिवसांनी निघून गेली तेव्हा मला रडावंसं वाटलं. मला निराशा वाटत होती. माझी जगण्याची सर्व इच्छाच संपली होती. मग मी मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली आणि मोकळेपणाने बोलले. त्यानंतर माझी मानसिक स्थिती ठीक झाली.
मानसिक आरोग्याबद्दल दीपिकाच्या टिप्स
दीपिका पुढे म्हणाली की, मी नैराश्यात कसा येऊ शकतो? असा प्रश्न अनेकांना पडतो. मी देखील असाच विचार करायचे. पण, या अनुभवानंतर मला जाणवलं की, हे फक्त संभाषण आणि समजुतीनेच सोडवता येईल. त्यामुळे अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्यावर तुमचे चांगले नियंत्रण आहे. ध्यान करा, व्यायाम करा किंवा तुमच्या पालकांशी बोला, असा सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिला आहे. आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे, याबद्दल स्पष्ट राहा. सर्व लोक अपयशी होतात. मात्र, तुमच्या आयुष्याचा आनंद घ्या. मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या भावना लोकांना सांगण्यास कधीही संकोच करू नका. उघडपणे बोलण्यास कधीही संकोच करू नका. तुमचे विचार आणि चिंतेबाबत आपल्या जवळच्या लोकांशी बोलून तुम्हाला बरे वाटू शकते, असे देखील दीपिकाने म्हटले आहे.
आणखी वाचा























